दंगलीसाठी मोदी जबाबदार नाहीत, ते तर पोलीस यंत्रणेचे अपयश- केपीएस गिल

नवी दिल्ली – गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या जातीय दंगलींना नरेंद्र मोदी नव्हे तर पोलिस खात्यातील धार्मिक गटबाजी आणि शेजारच्या राज्यांचं असहकार्य कारणीभूत असल्याचा दावा माजी आयपीएस अधिकारी केपीएस गिल यांनी केलाय.

केपीएस गिल, द पॅरामाऊंट कॉप या चरित्राचं काल प्रकाशन करण्यात आलं…. याच पुस्तकात हा दावा करण्यात आला. ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सरदार कंवर पाल सिंह गिल म्हणजेच केपीएस गिल हे पंजाबचे पोलीस महासंचालक होते. गुजरातमध्ये दंगली भडकल्या त्यावेळी केपीएस गिल हे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे सुरक्षा सल्लागारही होते.

गुजरात मधील त्यावेळच्या भीषण दंगलीसाठी मोदींना जबाबदार धरता येणार नाही, असं स्पष्ट करतानाच त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्याला प्रतिसाद पोलिस नेतृत्वाने द्यायचा असतो, राजकीय नेतृत्वाने नाही, असंही गिल यांनी म्हटलंय. गिल यांच्या या नव्या दाव्यामुळे नरेंद्र मोदींवरील दंगलीचा डाग दूर होण्यास मदत होणार असली तरी एका नव्या वादालाही तोंड फुटण्याची शक्यता आहे.

जेव्हा दंगली झाल्या तेव्हा पोलिस खात्यामध्येच दोन धार्मिक गट तयार झाले आणि त्यामुळेच दंगल उफाळल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आलाय… शिवाय दंगली दरम्यान नरेंद्र मोदी यांनी शेजारच्या राज्यांकडे मदतीची याचना केली होती. पण एकाही राज्याने त्यांना मदत पुरवली नसल्याचं या पुस्तकात सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेजारचं राज्य म्हणजे महाराष्ट्रानंही गुजरातच्या दंगली थांबवण्याचा प्रयत्न जाणूनबूजून केला नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिवाय गिल यांनी नरेंद्र मोदी यांना दिलेली क्लीन चिटही लक्षवेधी आहे. केपीएस गिल यांच्या केपीएस गिल-दि पॅरामांऊट कॉप या चरित्राच्या प्रकाशन कार्यक्रमात इंडियन एक्स्प्रेसचे संपादक शेखर गुप्ता, पंजाब केसरीचे संपादक विजयकुमार चोप्रा आणि सीबीआयचे माजी संचालक पीसी शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

2002 च्या गोधराकांडानंतर उसळलेल्या दंगलीच्या वेळी मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांच्याकडे फारसा अनुभव नव्हता. त्यांची प्रशासनावर मजबूत पकड नव्हती. त्याचाच फायदा गुजरात पोलिसांमधील धार्मिक गटाच्या अधिकार्‍यांनी उठवला आणि दंगल भडकली, असा आरोपही केपीएस गिल यांनी केला आहे. गुजरात दंगलीच्या खूप नंतर म्हणजे मे 2002 मध्ये मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा सल्लागार म्हणून केपीएस गिल यांची नियुक्ती झाली होती.

Leave a Comment