तुर्कस्तानात जगातील पहिली अंडरवॉटर रेल्वे

इस्तंबूल – दोन खंडांना जोडणारी जगातील पहिली अंडरवॉटर रेल्वे लिंक तुर्कस्तानात मंगळवारपासून खुली झाली. ही रेल्वे लिंक आशिया आणि युरोप या दोन खंडांना जोडते. विशेष म्हणजे असा पाण्याखालून बोगदा काढून दोन खंडांना जोडण्याचे स्वप्न १०० वर्षांपूर्वीच तुर्कस्तानचा तत्कालिन सुलतान ऑटोमन याने पाहिले होते. या रेल्वे लिंक मुळे शंभर वर्षांचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरल्याची भावना वाहतूक मंत्री बिनाली याल्डिम यांनी व्यक्त केली आहे.

या महत्वाकांक्षी रेल्वे लिंक चे नामकरण मरमारे प्रकल्प असे करण्यात आले आहे. युरोप व आशिया या दोन खंडांना जोडणार्याी या मार्गाची लांबी १३ किमी असून तो ६० मीटर खोल आहे. ही रेल्वे अतिजलद आहेच पण त्यातून मालवाहतूकही केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे या दोन खंडातील ऐतिहासिक सिल्क रूटचेच पुनरूज्जीवन झाले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे आधुनिक तुर्कीश रिपब्लिकनचा ९० वा वर्धापन दिन साजरा होतानाच या रेल्वेचे उद्घाटन झाले आहे. या मार्गाचा तुर्कस्तानचा वेगाने विकास होण्यात फारच मोठा हातभार लागणार आहे.

या रेल्वेसाठी पाण्याखालून बोगदा खणणे हे मोठे आव्हान होते. प्रकल्पासाठी ५.५ अब्ज लिरा म्हणजेच २.८ अब्ज डॉलर्स इतका खर्च आला आहे. विशेष म्हणजे या महत्त्वाकांक्षी आणि महत्वाच्या प्रकल्पाला तेथील विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला होता. तुर्कस्तानने पुढील दहा वर्षात २५० अब्ज डॉलर्स खर्चून रस्ते, उर्जा व आय टी इन्फ्रा स्ट्रक्चर उभारणी करण्याचा निर्णयही घेतला आहे.

Leave a Comment