डॉ. हर्षवर्धन यांच्याविरोधात उमेदवारीबाबत कॉंग्रेसमध्ये संभ्रम

नवी दिल्ली- दिल्लींतील मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने उमेदवार म्हणून डॉ. हर्षवर्धन यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यांच्याविरोधात आता कुणाला उमेदवारी द्यावी, या विंवचनेत सध्या दिल्लीतील काँग्रेस नेते आहेत. कृष्ण नगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणा-या डॉ. हर्षवर्धन यांच्याविरोधात अलीकडेच भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या डॉ. वी. के. मोंगा यांना उमेदवारी देण्यावर काँग्रेसमध्ये चर्चा झाली होती.

‘परंतु मी भाजपमधून बाहेर पडलो तरी डॉ. हर्षवर्धन यांच्याशी असलेले कौंटुबिक संबंध मला संपुष्टात आणायचे नाहीत’, असे सांगून मोंगा यांनी काँग्रेसला अडचणीत टाकले आहे. अशीच स्थिती आम आदमी पक्षाची आहे. भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराविरोधात आपण निवडणूक लढवू, अशी घोषणा करणारे आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी देखील अरविंद केजरीवाल यांची निराशा केली आहे.

गाझियाबादमध्ये राहत असल्याने कृष्ण नगर मतदारसंघातून निवडून येणे तर सोडाच, अमानत सांभाळणे अवघड होईल, असे कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांना सांगितल्याने आम आदमी पक्षासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. शहर विकास मंत्री अरविंदर सिंह लवली यांना हर्षवर्धनांविरोधात उमेदवारी देण्याचा आग्रह काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख अजय माकन यांनी धरला होता. परंतु संपत्तीच्या वादातून हत्या झालेल्या मद्यसम्राट पाँटी चढ्ढा यांच्याशी असलेल्या अतिसंपर्कामुळे अरविंदर सिंह लवली यांच्यावर काँग्रेस हायकमांडची खप्पामर्जी आहे. त्याामुळे कॉंग्रेस व आमआदमी पक्षाला त्यांच्या विरोधात उमेदवार मिळत नाही.

Leave a Comment