स्नोडेनला बड्या रशियन कंपनीची नोकरी

मास्को – अमेरिकेकडून जगातील अन्य देशांवर केल्या जात असलेल्या हेरगिरीसंबंधीची कागदपत्रे जगासमोर आणणारा एडवर्ड स्नोडेन याला बड्या रशियन कंपनीने कामावर रूजू करून घेतले असून तो १ नोव्हेंबरपासून कामावर जाऊ लागला असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेतून पलायन केल्यानंतर स्नोडेनने रशियात आश्रय घेतला असून त्याला आता तीन महिने झाले आहेत. त्याला सध्या पैशांची चणचण जाणवत आहे. त्यामुळे एका बड्या रशियन कंपनीने त्याला जॉब ऑफर दिल्याचे व त्याच्याकडे महत्त्वाची अशी रशियन वेबसाईट विकसित करण्याचे व त्याला सपोर्ट करण्याचे काम दिले गेले असल्याचे त्याचे वकील अँटोली कुचरेना यांनी सांगितले.

अॅंटोली यांनी स्नोडेन सध्या कुठे आहे आणि कोणत्या कंपनीने त्याला नोकरी दिली आहे याविषयी माहिती देण्यास नकार दिला आहे. ही माहिती उघड झाली तर स्नोडेनची सुरक्षा धोक्यात येऊ शकते असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र ही रशियन कंपनी फेसबुकच्या तोडीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांनी अमेरिकेची स्नोडेनला स्वदेशी पाठविण्याची विनंती अमान्य केल्यानंतर त्याला रशियात ताप्तुरता आश्रय दिला गेला आहे. दर वर्षाला या मुदतीत वाढ केली जाणार आहे. स्नोडेनच्या समर्थकांनी त्याच्यासाठी सुरू केलेल्या मदत वेबवाईटवरून आत्तापर्यंत ४९ हजार डॉलर्स डोनेशन म्हणून गोळा झाले असल्याचेही समजते.

Leave a Comment