सरदार पटेलांना कोणत्याही पक्षाशी जोडणे चुकीचे – मोदी

केवडिया (गुजरात) – भारताचे लोहपुरूष म्हणून ओळख असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणत्याही पक्षाशी जोडणे चुकीचे आहे, असे करणे म्हणजे त्यांच्या कार्यावर अन्याय केल्यासारखे आहे असे उद्गार आज गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज केवडिया येथे काढले. ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिवशी आयोजित केलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या स्मारकाच्या पायाभरणी समारोहात बोलत होते.

गुजरातमध्ये पटेल यांचे 182 मिटर उंचीच्या (द स्टेच्यू ऑफ युनिटी) या पुतळ्याची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. या पायाभरणी कार्यक्रमानंतर मोदी यांनी हे स्मारक जगातील सर्वात मोठे ठरणार असून यामुळे संपूर्ण जग आपल्याकडे बघेल असे गौरवोग्दार काढले. सरदार पटेलांनी सर्वांना जोडले, मात्र कधीच एकालाही तोडले नाही. जर पटेल नसते तर आपला देश अखंड राहिला नसता. त्यामुळे या महान नेत्याच्या कार्यावर आपल्याला अभिमान हवा. आज देशाला वोट बँकेचा सेक्यूलॅरिझम नको, तर सरदार पटेलांचा सेक्यूलॅरिझम पाहिजे, असेही मोदी म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सरदार सरोवर धरण म्हणजे सरदार पटेल यांचे स्वप्न होते. आज या ऐतिहासिक दिवशी एका नविन संकल्पाची पायाभरणी होत आहे. मागील 23 वर्षांपासून मी स्वप्न पहात होतो. या कार्यासाठी मला अनेक जणांनी प्रेरणा दिली आहे मी त्यांचे शतशः आभार मानतो. या स्मारकामुळे आम्हाला प्रत्येक गावागावातून लोकांना जोडता येईल.’

सरदार वल्लभभाई पटेलांच्या या हा पुतळा सरदार सरोवरजवळील साधू बेटावर उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याची उंची 182 मीटर (597 फूट) असून यासाठी 2075 कोटी एवढा कर्च येणार आहे. तर या स्मारकासाठी 42 महिने लागणार आहेत.