यंदाच्या दिवाळीत फटाके विक्रीत घट

पुणे – शाळाशाळांतून विद्यार्थ्यांनी दिवाळी सुरक्षितपणे साजरी करावी आणि पर्यावरणच्या दृष्टीने ध्वनी प्रदूषण व हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी फटाके उडवू नयेत यासाठी राबविल्या गेलेल्या अभियानाला चांगले यश मिळाल्याचे दिसून आले असून यंदा फटाके विक्रीत देशभरात २५ ते ३० टक्के घट झाली आहे.

असोचेमने गेली २५ दिवस हे सर्वेक्षण अहमदाबाद, पुणे, मुंबई, बंगलोर, भोपाळ, पाटणा, चंदिगढ, सुरत, चेन्नई, कोलकाता,लखनौ, हैद्राबाद, जयपूर, दिल्ली,कानपूर अशा देशातील महत्त्वाच्या शहरातील १५० शाळांमध्ये केले.यंदा फटाक्यांच्या किमती १० ते १५ टक्यांनी वाढल्या आहेत. मात्र विक्रीतील घट ही किंमत वाढीमुळे नसून शाळांतून केल्या गेलेल्या जागरण मोहिमांमुळेच असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे.

अनेक शाळांमधून फटाके उडविणार नाही अशी शपथ विद्यार्थ्यांना दिली गेली आहे तर अनेक शाळांनी पालकांच्या कार्यशाळा आयोजित करून पर्यावरण रक्षणासाठी फटाके विकत घेऊ नका हे पटवून दिले आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांनीही या जागरण मोहिमांत सहभाग घेतला असल्याचे असोचेमचे महासचिव डी.एस. रावत यांनी सांगितले.

Leave a Comment