भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या मृत्यूपत्रावरून वाद

पुणे – भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या मृत्यूपत्रात फेरबदल केल्याचा आरोप जोशी यांच्या प्रथम पत्नीचा मुलगा राघवेंद्र याने केला असून या मृत्यूपत्रासंबंधीने दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. दिवाणी न्यायालयाचे सहन्यायाधीश एस.आर. यादव यांनी दाव्याच्या अंतिम निकाल लागेपर्यंत  जोशी यांच्या मालमत्तेची वाटणी केली जाऊ नये असा अंतरिम आदेश दिला आहे.

या संबंधी मिळालेल्या माहितीनुसार राघवेंद्र यांनी या मृत्यूपत्रासंबंधाने २०१२ सालीच आपले सावत्र भाऊ जयंत, श्रीनिवास व अन्य पाच कुटुंबियांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. मृत्यूपत्रात वापरण्यात आलेली भाषा अतिशय विचित्र असून पंडितजी असे कधीही बोलत नसत असे त्यांचे म्हणणे आहे. मृत्यूपत्राची रजिस्टर नोंदणी करण्यापूर्वी फेरबदल केले गेले असल्याचा त्यांचा दावा असून हे मृत्यूपत्र केले गेले तेव्हा पंडितजींचे वय ८६ वर्षांचे होते व त्यांची  मनस्थिती अस्वस्थ होती आणि ते बेडरिडन होते. मृत्यूपत्रावर साक्षीदारांच्या सह्या असल्या तरी पंडितजींचे आरोग्य व मनस्थिती उत्तम असल्याचे हेल्थ सर्टिफिकेट नव्हते असेही त्याचे म्हणणे आहे.

पंडितजींनी दुसरा विवाह केला असला तरी प्रथम पत्नी आणि मुलाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मात्र २४ जानेवारी २०११ ला त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या घरी मृत्युपत्राचे वाचन करण्यासाठीच राघवेंद्र यांना बोलावले गेले तेव्हा त्यात वापरण्यात आलेली भाषा पाहून उपस्थितही अवाक झाल्याचे राघवेंद्र यांचे म्हणणे आहे. तसेच पंडितजींच्या मालकीचा सदाशिव पेठेतील कलाश्री बंगला, एरंडवणा भागातील दोन फ्लॅट व १८ विविध म्युझिक कंपन्यांकडून मिळत असलेल्या रॉयल्टीचा उपभोग जयंत, श्रीनिवास व त्यांच्या बायकाच घेत आहेत असेही त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment