पाटणा– पाटणा शहर रविवारी नरेंद्र मोदी यांच्या हुंकार सभेपूर्वी बॉम्बस्फोटांच्या मालिकेने हादरले होते. या साखळी बॉम्बस्फोट मालिका प्रकरणातील मुख्य आरोपी ऐनुल ऊर्फ तारीकचा शुक्रवारी पहाटे रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्याच्यावर इंदिरा गांधी मेडिकल इन्स्टियूट रुग्णालयात उपचार सुरु होते. तारीकला रुग्णालयात दाखल केले त्या दिवसापासून तो कोमामध्ये होता. इंडियन मुजाहिद्दीनने हे स्फोट घडवून आणले. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला.
रविवारी पाटणा रेल्वे स्थानकात झालेल्या पहिल्या बॉम्बस्फोटात तारीक जखमी झाला होता. तारीक आणि त्याचा साथीदार इम्तियाज अन्सारी रेल्वे स्थानकावरील शौचालयात बॉम्ब ठेवत असताना, बॉम्बशी जोडलेल्या टायमरची टिकटिक सुरु झाली. त्यामुळे घाबरलेले तारीक आणि इम्तियाज बॉम्ब तिथेच टाकून पळत असताना, बॉम्बचा स्फोट झाला.
या स्फोटात तारीक गंभीर जखमी झाला होता. इम्तियाज स्फोटकांनी भरलेली बॅग घेऊन पळत असताना त्याला पोलिसांनी पकडले. पोलिसांच्या दाव्यानुसार इम्तियाज अन्सारी या स्फोट मालिकेचा मुख्य सूत्रधार आहे.