धूम्रपानाची सवय हा मानसिक दोष

सिगारेट ओढण्याने कर्करोग होतो असे किती तरी वेळा सांगितले जात असते. लोकांनी सिगारेट ओढणे बंद करावे असा प्रचारही वारंवार केला जातो. सिगारेटच्या पाकिटावर तसे लिहिलेले असते. एवढ्यावरही लोक सिगारेट सोडत नाहीत. सारे काही समजत असूनही त्यांना हे व्यसन सोडावेसे वाटत नाही. सारे काही समजत असूनही ते पुन्हा पुन्हा सिगारेट ओढतच असतात. मग अशा लोकांना काय म्हणावे ? हा तर शुद्ध वेडेपणाच आहे. पण सिगारेट ओढणारा काही स्वत:ला वेडा समजत नाही. तो तर सिगारेट ओढणे कसे मस्त असते हे आपल्यालाच पटवत असतो. तो काहीही म्हणो पण आता ब्रिटनमध्ये असे दिसून आले आहे की, सिगारेट ओढणारे लोक बर्‍याच अंशी शब्दश: वेडे असतात.

ज्यांना काही तरी मानसिक आजार असतो असेच लोक बहुधा धूम्रपान करीत असतात असे ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या एका पाहणीत आढळून आले आहे. तिथे सिगारेट ओढणारांची एक विस्तृत पाहणी करण्यात आली तेव्हा असे आढळले की, सिगारेट ओढणार्‍या जवळजवळ प्रत्येकाच्या मनात काही तरी गडबड असते, काही तरी दोष असतो. दर तीन धूम्रपींपैकी एकात तर इतका मानसिक दोष असतो की, त्याच्यावर मानसशास्त्रज्ञांचे उपचार सुरू असतात, गोळ्या सुरू असतात. म्हणजे जवळजवळ ३५ टक्के धूम्रपी हे थोड्या बहुत ङ्गरकाने मनोरुग्ण असतात. आपल्या देशात दारू सोडण्याच्या बाबतीत काही प्रयोग सुरू असतात आणि ते प्रयोग करणारे तज्ञ लोक दारू पिण्याला केवळ व्यसन न मानता एक प्रकारचा मानसिक रोगच मानत असतात.

ब्रिटनमधील तज्ञांंना धूम्रपानाच्या बाबतीत तर असे वाटतेच पण दारूच्या बाबतीतही त्यांना तसेेच आढळले आहे. सिगारेट आणि दारू या दोन्हींचेही व्यसन असलेल्या अनेक लोकांची पाहणी केली असता असे आढळले की, दोन व्यसने करणारांपैकी ३५ टक्क्यांहूनही अधिक लोक मानसोपचार घेत असतात. भारतात अशी पाहणी केली तर काय आढळेल ? ही व्यसने करणारांत मानसिक कमतरता असल्याचे आढळेलच पण त्यातले कित्येक लोक त्यापोटी मानसोपचार घेत नाहीत असे दिसेल कारण आपल्या देशात लहान सहान मानसिक दोषांसाठी मानसोेपचार तज्ञांकडे जाण्याची प्रवृत्ती नाही. पण आपला अनुभव असा आहे की ही व्यसने करणारे लोक मुख्यत्वे आत्मविश्‍वासाचा अभाव असल्यामुळेच व्यसनांना जवळ करीत असतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment