भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

नागपूर – नागपूर येथे आज झालेल्या वन डे मॅचमध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. सहा विकेट आणि तीन चेंडू राखुन भारताने हा सामना जिंकत या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो नाबाद शतकी खेळी करणारा विराट कोहली. विराट कोहली, शिखर धवन, रोहीत शर्मा आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा ऑस्ट्रेलियावरील या विजयात महत्त्वाचा वाटा होता.

कोहलीने निर्णायक क्षणी आपला खेळ उंचावला आणि अवघ्या 66 चेंडुत 115 धावांची नाबाद शतकी खेळी साकारली. सलामीवीर रोहीत शर्मा आणि शिखर धवन यांनी 178 धावांची भागिदारी रचून चांगली सुरुवात करुन दिली. रोहीत 79 धावांवर बाद झाल्यानंतर शिखर धवनही शतक झळकाऊनच परतला. महेंद्रसिंग धोनीने नाबाद 25 धावा काढून कोहलीला सुरेख साथ दिली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जॉर्ज बेलीची दिडशतकी खेळी आणि ऑलराऊंडर शेन वॉटसनची शतकीय खेळी ऑस्ट्रेलियाच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करणार्‍या बेलीने अवघ्या 114 चेंडूत 156 धावा पटकावल्या. यात 6 षटकार आणि 13 चौकारांचा समावेश होता. तर भारतीय गोलंदाजीचा समाचार घेताना वॉटसननं 13 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 102 धावा काढल्या. भारताकडून रवींद्र जडेजा आणि रवीचंद्रन अश्विन या फिरकीपटूंनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

Leave a Comment