बुंदेलखंडमध्ये सापडली 4000 कोटींची संपत्ती!

बुंदेलखंड – उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये साधूच्या स्वप्नातील सोने पुरातत्त्व विभागाला सापडो अथवा न सापडो, मात्र बुंदेलखंडमधील 4000 कोटींच्या खजिन्याचा शोध भूगर्भ शास्त्रज्ञांनी लावला आहे. या भागात खनिज आणि खाण विभागाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या सर्वेक्षणानंतर तिथं विविध खनिजांचे विपुल प्रमाणात साठे उपलब्ध असल्याचे समोर आले आहे.

ही खनिज संपत्ती तब्बल 4000 कोटींची असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड विभागात खनिज संपत्तीचे विपुल साठे उपलब्ध असल्याचं खाण आणि खनिज विभागाच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे. राज्यातील झाशी, जालौन, महोबा, हमीरपूर, बांदा, चित्रकूट आणि ललितपूर या सात जिल्ह्यांमधील विस्तीर्ण पठारांचे सर्वेक्षण करून केलेल्या अभ्यासानंतर संशोधकांनी हे सांगितले.

यासोबतच उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील सोनभद्रमध्येही सोन्याचे साठे असल्याचे या अधिकार्‍यांनी सांगितले. तेथील अनेक साईट्सवर केलेल्या सर्वेक्षणानंतर एक अहवाल तयार करण्यात आला आहे. बुंदेलखंड विभागात सोने आणि प्लाटिनमसह पोटॅश, अ‍ॅस्बेस्टॉस आणि सिलिकाचे प्रचंड साठे असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

आतापर्यंत उत्तर प्रदेशातून डायसापोर, डोलोमाईट, चुन्याचा दगड, मँगेनिज आणि फॉस्फोराईटसारखी खनिजच काढली जात होती. झाशीत सर्वाधिक खनिज संपत्ती असल्याचे या अहवालात म्हटले आहे. झाशीच्या विस्तीर्ण पठारात तब्बल 4.5 कोटी टन सिलिका असल्याचे सर्वेक्षणादरम्यान आढळून आले आहे. या सिलिकाची बाजारातील किंमत तब्बल 890 कोटी रुपये असल्याचे अधिकारी म्हणाले. स्टील, लोखंड, सिरामिक्स आणि विटरिस टाईल्समध्ये सिलिकाचा वापर केला जातो.

Leave a Comment