नवी दिल्ली : पाटणा स्फोटाचा तपास सध्याम जोमाने सुरू आहे. याप्रकरणी एनआयएने मोहम्मद आफताब अन्सारी नावाच्या व्यक्तीला संशयावरून ताब्यात घेतले आहे. अन्सारी हा बिहारमधील मुजफ्फरपूरचा रहिवासी असून तो दिल्लीला येत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले असल्याीचे समजते. आफताब अन्सारी हा पाटण्यातील भाजपच्या हुंकार रॅलीमध्ये स्फोट घडवून आणल्याप्रकरणी याआधीच ताब्यात घेण्यात आलेल्या इम्तियाज अन्सारी याच्या सतत संपर्कात होता.
मोहम्मह आफताब अन्सारी याच्याकडून एक लॅपटॉप आणि पाकिस्तानी सिम कार्ड मिळाल्याची माहितीही एनआयएच्या सुत्रांनी दिली आहे. इम्तियाज अन्सारी याने दिलेल्या माहितीनंतरच आफताब अन्सारीला मुजफ्फरपूरहून दिल्लीला येत असताना ताब्यात घेण्यात आले. आफताब अन्सारीकडे सापडलेल्या लॅपटॉपमध्ये या स्फोटाची ब्लू प्रिंट असल्याचा एनआयए अधिका-यांना संशय आहे.
पाटण्यातील मोदी यांच्या रॅलीवरील हल्ल्याप्रमाणेच देशभरात कुठे कुठे अतिरेकी घातपात करण्याची योजना आहे, याचा तपासही आफताब अन्सारीच्या लॅपटॉपवरून लागू शकतो असा विश्वास एनआयएच्या अधिका-यांना वाटू शकतो. आफताब अन्सारीकडून एनआयएला अधिक महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठीच त्याची अटक ही खूप महत्वाची मानली जातेय.