दोन कणखर व्यक्तीमत्त्वे

भारताच्या इतिहासात ज्यांची पोलादी पुरुष म्हणून नोंद झाली त्या सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती आहे आणि अशाच प्रकारचे कणखर नेतृत्व म्हणून आपण ज्यांना प्रत्यक्ष पाहिलेले आहे त्या इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. आपल्या देशामध्ये आज कणखर, दूरदर्शी राष्ट्रीय नेतृत्वाचा अभाव जाणवत आहे. ज्यांना लोकांनी लिहून दिलेली चार वाक्येसुध्दा नीट वाचता येत नाहीत असे लोक देशाचे नेतृत्व करत आहेत आणि ज्या माणसाला मानापमानाची कसली चाड नाही असा माणूस देशाचे भवितव्य घडवू पहात आहे. ही मोठी दुर्दैवी अवस्था आहे. ही अवस्था अशा एका गौरवशाली परिस्थितीनंतर निर्माण झाली आहे की ज्या परंपरेत गांधी, नेहरू, पटेल, सावरकर, मुखर्जी, वाजपेयी, नरसिंहराव, इंदिरा गांधी अशा हिमालयाएवढ्या उंचीच्या नेत्यांची मांदियाळी निर्माण झाली होती. या सर्वांकडे देशाला वळण लावण्याची क्षमता होती. आज त्यांच्या क्षमतेच्या तुलनेत विद्यमान नेत्यांची कुवत तपासून पाहिली तर फार दुर्दैवी निष्कर्ष हाती येतात. आज भारताच्या तिसर्‍या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी पाळली जात आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी होत आहे. पटेल आणि इंदिरा गांधी या दोघांच्या नेतृत्वामध्ये एक साम्य होते आणि ते साम्य म्हणजे कणखरपणा. पटेलांना तर भारताचे पोलादी पुरुष म्हणतात.

या दोघांच्याही खात्यावर इतिहासाला वळण लावणार्‍या कामांची नोंद झाली आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा या देशात ६०० संस्थाने होती. ती तशीच राहिली असती तर आज देशाचे चित्र काय राहिले असते याची कल्पनासुध्दा करवत नाही. पटेलांनी या सर्व संस्थानिकांना भारतात विलिन व्हायला लावले आणि आज जसा भारत देश बघत आहोत तसा तो निर्माण केला. त्यांची ही कामगिरी हजारो वर्षातसुध्दा लक्षात ठेवावी लागेल. इंदिरा गांधी यांच्या नावावरसुध्दा देशामध्ये परिवर्तन घडणार्‍या तीन घटनांची नोंद आहे. एक बँकांचे राष्ट्रीयीकरण, दुसरी हरितक्रांती आणि तिसरी घटना म्हणजे पाकिस्तानचे विभाजन. त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. बांगला देशाच्या निर्मितीला सगळ्या प्रकारची मदत केली आणि पाकिस्तानच्या या अराजकात भारताला हस्तक्षेप करणे कसे गरजेचे आहे हे जगाला पटवून देऊन बांगला देशाची निर्मिती केली. त्यांच्या या कामाबद्दल तर त्यांना मानाचा मुजराच केला पाहिजे. इंदिरा गांधी यांनी केलेले दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे बँकांचे राष्ट्रीयीकरण. इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करून भारताच्या अर्थकारणात गरिबांना मध्यवर्ती स्थानी आणले.

केंद्र सरकारने आता नव्या अन्न सुरक्षा योजनेला ‘इंदिराम्मा अन्न योजना’ असे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. नेमक्या त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच हा निर्णय घेऊन केंद्र सरकारने औचित्य राखले आहे. इंदिरा गांधींनी गरिबांसाठी केलेले कार्य अजरामर ठरले आहे. १९६९ साली त्यांनी देशातल्या १४ व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. राष्ट्रीयीकरण होण्यापूर्वी सामान्य गरीब माणसाचा बँकेशी कसलाच संबंध नव्हता. बँकेत खाते उघडणे, त्या खात्यात पैसे ठेवणे, पैशाची देवाण-घेवाण करणे आणि गरज पडल्यास बँकेतून कर्ज घेणे हे विषय गरीब माणसाच्या जीवनात नव्हतेच. गरीब लोकच पण मध्यमवर्गीय लोकसुध्दा कधी बँकेची पायरी चढत नसत. पण आता गरिबात गरीब माणूस सुद्धा बँकेत पैसे ठेवू शकतो, खाते उघडू शकतो, बँकेतून कर्ज घेऊ शकतो. ४० वर्षांपूर्वी बँका ह्या केवळ व्यापार्‍यांसाठीच होत्या. इंदिरा गांधी यांनी व्यापारी बँकांचा पैसा आधी देशाच्या मालकीचा केला आणि मग त्यात गरीब माणसाला प्रवेश मिळाला. १९७० सालपासून देशातल्या गरिबांच्या जीवनामध्ये नवे पर्व सुरू झाले. इंदिरा गांधी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच हरित क्रांतीचा नारा दिला. आपल्या देशामध्ये आज अन्नधान्याच्या सुबत्तेचे दिसत असलेले दृश्य त्या हरित क्रांतीमुळेच निर्माण झालेले आहे. कारण तत्पूर्वी आपला देश धान्याच्या बाबतीत परावलंबी होता.

परदेशातून धान्य आल्याशिवाय देशातल्या रेशन दुकानांवर धान्य मिळत नव्हते. देशाच्या गरजेएवढे धान्य देशात पिकत नव्हते. इंदिरा गांधी यांनी हरित क्रांतीचा पाया रोवला. प्रगत बियाणे, रासायनिक खते, पाणी आणि धान्य खरेदीची हमी या चार सूत्रांचा समन्वय साधून त्यांनी हरित क्रांती यशस्वी केली. हरितक्रांतीमुळे पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश या राज्यात प्रचंड गहू पिकला. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये तांदळाचे उत्पादन भरपूर झाले आणि त्यामुळे देश धान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला. १९७४ नंतर भारताने धान्याची आयात पूर्ण बंद केली आहे. भारताचे हे धान्याच्या बाबतीतले स्वावलंबन इंदिरा गांधी यांच्या धोरणामुळे साध्य झाले आहे. एकेकाळी धान्याच्या आयातीवर जगणारा हा देश आज जगातल्या २० देशांना धान्य निर्यात करत आहे. ही अभिमानास्पद स्थिती इंदिरा गांधींच्या धोरणाचा परिपाक आहे. आज या देशातल्या कित्येक गोदामांमध्ये धान्य ओसंडून वहात आहे. म्हणून ते गरिबांना स्वस्तात देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. खरोखर या देशातले हे एक मोठे परिवर्तन मनाला विलक्षण समाधान देणारे ठरले आहे. देशातला गरीब माणूस परवडेल एवढ्या किंमतीमध्ये पोटभर अन्न खाऊ शकणार आहे. या प्रगतीचे श्रेय ितचा पाया घालणार्‍या इंदिरा गांधी यांनाच आहे.