
जगभरातच वाहनांच्या अपघाताचे प्रमाण चिंताजनक झालेले आहे. दारू पिऊन वाहने चालवणे, अधिकवेळ ड्रायव्हिंग करणे, तुफान वेगाने गाड्या पळवणे, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न वापरणे ही अपघाताची महत्त्वाची कारणे असल्याचे लक्षात आले आहे. या संबंधाने केलेले नियम वाहन चालवणार्यांनी पाळले आणि पोलिसांनी हे नियम न पाळणार्यांवर कडक कारवाई केली तर अपघाताचे प्रमाण बरेच खाली येण्याची शक्यता आहे. परंतु आत्ताच्या काळात सर्वसामान्य माणूसच बेदरकार आणि बेफिकिर व्हायला लागला आहे. शक्यतो नियम न पाळणे हे मोठे पराक्रमाचे लक्षण मानले जायला लागले आहे. त्यातल्या त्यात १५ ते २९ वर्षे वयोगटातील तरुणांचे अपघात जास्त होतात. नियम धुडकावून लावणे आणि तुफान वेगाने गाड्या चालवणे हे याच वयोगटातल्या तरुणांचे लक्षण असते. अशाच प्रवृत्तीतून काल आंध्र प्रदेशात महेबुबनगर जिल्ह्यात अंगावर काटा आणणारा भीषण बस अपघात झाला. बंगळुरूहून हैदराबादला जाणारी लक्झरी बस पेटून तिच्यातल्या ५० पैकी ४५ प्रवाशांचा मृत्यू झाला. केवळ पाच लोक वाचले. हा अपघात एवढा भीषण होता की मृतदेह कोणाचे आहेत हे ओळखणेही कठीण होऊन बसले होते. ही लक्झरी बस एका छोट्या पुलाला धडकली. तिच्या इंधनाच्या टाकीने पेट घेतला. बरेच प्रवासी झोपेत होते. त्यांना काही कळण्याच्या आत बस आगीच्या लोळात लपेटली गेली आणि ४५ जणांचे जळून कोळसे झाले.
अलीकडच्या काळातला हा फार मोठा अपघात आहे. तसे लहान-मोठे अपघात राज्याच्या विविध भागांमध्ये सतत होत असतात. मात्र एकाच बसमधील ५० पैकी ४५ प्रवासी जळून मरावेत एवढा भीषण अपघात गेल्या काही दिवसात तरी झालेला नाही. अपघाताची वेळ पहाटेची होती, त्यामुळे अपघाताच्या कारणाचा कोणीही सामान्य माणूस सहज अंदाज करू शकतो. ड्रायव्हरला मर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवायला लावली असेल, असे वरकरणी तरी दिसते. मर्यादेपेक्षा अधिक वेळ गाडी चालवली की, पहाटेच्यावेळी ड्रायव्हरचा डोळा लागतो आणि असे अपघात होतात. खाजगी बसगाड्यांच्या ड्रायव्हरांनी किती तास गाडी चालवावी याला काही मर्यादा नाही. काही काही वेळा पूर्ण रात्रभर एकच ड्रायव्हर गाडी चालवतो. ही गाडी बंगळूरहून हैदराबादला चालली होती. दक्षिण भारतातील चेन्नई, हैदराबाद, बंगळूर या शहरांच्या दरम्यान धावणार्या बसगाड्यां मध्ये प्रवास करणार्या प्रवाशांच्या बाबतीत नेहमीच एक गोष्ट सांगितली जाते की, ते गाडीच्या ड्रायव्हरच्या मागे गाडी वेगात चालवण्याचा सतत तगादा करत असतात. कमीत कमी वेळेत गाडी इप्सित स्थळी नेल्यास असे प्रवासी ड्रायव्हरला १००-२०० रुपये बक्षीस देत असतात आणि अशा बक्षिसाच्या आशेने ड्रायव्हर मंडळी वेगाने गाड्या चालवतात आणि त्यातून असे अपघात होतात.
मुंबई-आग्रा महामार्गावर असेच मालमोटारीचे अपघात होतात. असा नेहमीचा अनुभव आहे. विशेष करून मुंबईला भाजीपाला घेऊन जाणार्या मालमोटारी या रस्त्यावर हमखास अपघातग्रस्त होतात. या अपघातांची कारणे शोधली असता मोठी विचित्र गोष्ट लक्षात आली. मुंबईच्या भाजी मार्केटमध्ये पहाटे जो मालमोटारचालक आपली गाडी घेऊन पहिल्यांदा येईल त्याला तिथला भाजी बाजारातल्या आडत्या १०० रुपये बक्षीस देतो. आता ही बक्षिसाची रक्कम ५०० रुपयांवर गेली आहे आणि या ५०० रुपयांच्या आमिषाने ड्रायव्हर मंडळी तुङ्गान वेगाने गाडी चालवून अपघाताला निमंत्रण देतात. कसल्या तरी स्पर्धेच्या आहारी जाऊन स्वतःचाही जीव गमावतात आणि आपल्या सोबतच्या प्रवाशांच्याही मृत्यूस कारणीभूत ठरतात. अशी वेगाने वाहने चालवताना नियमांची पायमल्ली करणे हे अटळच असते. खरे म्हणजे रात्रीची वाहतूक करताना अनेक नियम पाळले पाहिजेत असे वारंवार सांगितले जाते परंतु आपल्या देशातल्या लोकांच्या मनात सुरक्षिततेच्या उपायांच्या बाबतीत नेहमीच उपेक्षेची भावना असते. सुरक्षेचे नियम पाळण्यासाठी नसतात, ते ङ्गक्त कागदोपत्री लिहिलेले असतात असेच लोक समजतात. ही बेदरकारवृत्ती केवळ वाहनांच्या बाबतीतच असे नाही तर विद्युत उपकरणे वापरण्याच्या बाबतीत, बांधकामाच्या बाबतीत सुद्धा असते. मात्र वाहनांच्या बाबतीत ती जास्त प्रकर्षाने जाणवते आणि त्यांचे परिणाम जास्त गंभीर स्वरूपाचे असतात. भारतामध्ये सातत्याने होणार्या वाहनांच्या अपघातांची जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा दखल घेतली आहे.
जगभरात होणार्या वाहन अपघातांमध्ये ९१ टक्के अपघात गरीब देशात होतात. या देशातल्या वाहनांची संख्या कमी असून सुद्धा तिथे अपघात जास्त होतात. म्हणजे दर हजार वाहनांमागे होणार्या अपघाताचे सरासरी प्रमाण या देशात जास्त आहे. अपघात होण्याच्या कारणांमागे वाहनांचा अति वेग आणि मद्यप्राशन करून गाड्या चालवणे ही दोन मुख्य कारणे आढळतात. शहरांमध्ये वाहनांचा वेग ताशी ५० कि.मी. पेक्षा कमी असावा, असा नियम आहे. पण तो पाळला जात नाही. तो कसोशीने पाळला तर जगातले ३० टक्के अपघात कमी होतील. याचा अर्थ अती वेगाचे वेड हे अपघाताचे मुख्य कारण आहे. त्याशिवाय मद्यप्राशन करून गाड्या चालवणे हे तर एक कारण आहेच. वैशिष्ट्य म्हणजे मागासलेल्या देशांपेक्षा प्रगत देशांमध्ये दारू पिऊन गाड्या चालवण्याचे प्रमाण जास्त आहे. या संबंधात कायदा आहे, परंतु त्याचे पालन केले जात नाही. ते कडकपणे केले तर २० टक्के अपघात टळतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.