हिरड्यातील जिवाणू सांगतील तुमचा वंश

न्यूयॉर्क- माणसाचे फिंगरप्रिंट ही जशी त्याची खास ओळख असते तशीच ओळख आता माणसाच्या हिरड्यामध्ये असलेल्या जिवाणूंपासूनही मिळू शकणार आहे. हे जिवाणूही फिंगरप्रिंट सारखेच प्रभावशाली असतात असे संशोधकांना संशोधनात आढळले आहे.

ओहियो विद्यापीठातील संशोधकांनी त्यासाठी चिनी, लॅटिन, गोरे व काळे अशा चार वंशांतील सुमारे १०० हून अधिक लोकांच्या तोंडात म्हणजेच लाळ, दाताच्या फटी, हिरड्यात असणार्‍या ४०० हून अधिक जिवाणूंचे संशोधन केले. वास्तविक हे संशोधन आफ्रिकी, अमेरिकन, व लॅटिन वंशाच्या लोकांमध्ये हिरड्याच्या रोगांचे प्रमाण सर्वाधिक का आहे हे तपासण्यासाठी केले जात होते. तेव्हा हा नवाच शोध संशोधकांना लागला.

या संशोधनाच्या प्रमुख पूर्णिमा कुमार म्हणाल्या की तोंडातील अन्य जागेत सापडणार्‍या जिवाणूंपेक्षा हिरड्यातील जिवाणू वंश ओळखण्यासाठी अधिक मदत करू शकतात कारण या जिवाणूंवर अन्न, टूथपेस्ट, तंबाखू अशा वस्तूंचा प्रभाव पडण्याची फारशी शक्यता नसते. हे जिवाणू प्रत्येकामध्ये विशिष्ठ प्रमाणात असतात व प्रत्येक वंशात विशिष्ठ जिवाणू आढळतात. त्यामुळे एखाद्या माणसाच्या तोंडातील या जिवाणूंच्या परिक्षणानंतर त्याचा वंश सांगणे शक्य होते असे दिसून आले आहे.

Leave a Comment