पुणे- गेले 28 दिवस प्रकृती अस्वास्थामुळे येरवडा तुरुंगातून तात्पुरत्या रजेवर बाहेर आलेला अभिनेता संजय दत्त उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी बुधवारी सकाळी नऊ वाजता येरवडा तुरुंगात पोहचला.

पुणे- गेले 28 दिवस प्रकृती अस्वास्थामुळे येरवडा तुरुंगातून तात्पुरत्या रजेवर बाहेर आलेला अभिनेता संजय दत्त उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी बुधवारी सकाळी नऊ वाजता येरवडा तुरुंगात पोहचला.
बुधवारी सकाळी सहा वाजता तो मुंबईतील निवासस्थानातून पुण्याच्या दिशेने रवाना झाला होता. 1993 च्या बाँबस्फोट प्रकरणात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला न्यायालयाने पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. 22 मे पासून संजय दत्त तुरुंगात आहे. मात्र दोन ऑक्टोबरपासून प्रकृती अस्वास्थामुळे संजय दत्त तात्पुरत्या रजेवर तुरुंगातून बाहेर आला होता.
पायामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याने उपचारासाठी संजय दत्तने रजा घेतली होती. बुधवारी सकाळी मुंबईतील निवासस्थानापासून निघताना त्याने अजूनही पायामध्ये वेदना जाणवत असल्याचे सांगितले. लवकर सुटकेसाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही त्याने चाहत्यांना केले आहे. यावेळी त्याची पत्नी मान्यता उपस्थित होती. तिने पुण्यापर्यंत संजयबरोबर प्रवास केला.