राजस्थानात सत्तांतर अटळ

जयपूर – राजस्थान विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला सत्ता गमवावी लागेल आणि भारतीय जनता पार्टी वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेत येईल, असा निष्कर्ष सीएनएन, आयबीएम आणि साप्ताहिक द वीक यांनी केलेल्या सर्वेक्षणातून निघाला आहे. सध्या कॉंग्रेस पक्षाच्या हातात सत्ता असली तरी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. ९६ जागांवर त्यांना विजय मिळाला होता आणि त्यांनी बसपाच्या आमदारांचा पाठींबा घेऊन सरकार स्थापन केलेले आहे. मात्र यावेळी कॉंग्रेसला ही स्थिती सुद्धा टिकवता येणार नाही, असे सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

कॉंग्रेसच्या जागा ९६ वरून ६० ते ६८ च्या दरम्यान येतील तर भारतीय जनता पार्टीला ११५ जागा मिळतील. या पक्षाला पूर्वी ७१ जागा मिळाल्या होत्या. यावेळी स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज आहे. राजस्थानातील ५५ टक्के मतदारांनी विद्यमान कॉंग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. परंतु केवळ २७ टक्के मतदारांनी ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असा कौल दिला आहे. मुख्यमंत्री कोण असावा, या प्रश्‍नावर वसुंधरा राजे यांच्या बाजूने मात्र ५१ टक्के मतदारांनी कौल दिला आहे.

गेल्या जुलैमध्ये करण्यात आलेल्या अशाच एका सर्वेक्षणात २३ टक्के मतदारांनी गेहलोत सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली होती. पण तीन महिन्यात अशा नाराज मतदारांचे प्रमाण ३८ टक्क्यांवर गेले आहे. या सरकारने रस्ते, रुग्णालये, शाळा, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, कायदा आणि सुव्यवस्था या सर्व पातळ्यांवर वाईट काम केले असल्याचे ३८ टक्के लोकांनी म्हटले आहे. याचा अर्थ प्रस्थापित विरोधी मतदार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. जाट, गुज्जर, अनुसूचित जाती-जमाती आणि महिला या वर्गांमध्ये गेहलोत यांच्यापेक्षा वसुंधरा राजे यांना जास्त पाठींबा व्यक्त होत आहे.

Leave a Comment