मर्केल यांच्यावरील हेरगिरीची ओबामांना होती माहिती

बर्लिन – जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांच्यावर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेकडून (एनएसए) हेरगिरी होत असल्याची कल्पना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना होती, अशी माहिती आज प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात दिली आहे. हेरगिरीबाबत नुसती माहितीच नाही, तर ओबामांनी व्यक्तिश: या गोष्टीला मान्यताही दिली होती, असे अहवालात म्हटले आहे. ही हेरगिरी गेल्या काही महिन्यांपूर्वीच थांबविण्यात आली.

मर्केल यांचा मोबाईल फोन टॅप करत असल्याची माहिती एनएसए’चे संचालक किथ अलेक्झांडर यांनी ओबामा यांना 2010 मध्ये दिली होती. यानंतर, ओबामा यांनी ही हेरगिरी थांबविण्याचे आदेश न देता उलट ती सुरूच ठेवून मर्केल यांची संपूर्ण माहिती काढण्याची सूचना एनएसए’ला केली, असे बिल्ड ऍम सॉनताग’ या वृत्तपत्राने अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याचा हवाला देत म्हटले आहे.

ओबामा यांचा मर्केल यांच्यावर विश्‍वास नव्हता, म्हणून त्यांना मर्केल यांच्या सर्व निर्णयांची माहिती हवी होती, असे या वृत्तपत्राने म्हटले आहे. यादरम्यान, एनएसए’ने मर्केल यांनी त्यांच्या मोबाईल फोनवरून पक्ष सहकार्‍यांशी केलेले संभाषण टॅप’ केले. मर्केल यांना या हेरगिरीचा संशय आल्यावर त्यांनी याबाबत ओबामांकडे तक्रार केली होती. मात्र, ओबामा यांनी या हेरगिरीबाबत काही माहिती नसल्याचे सांगितले, तसेच माहिती असती तर ताबडतोब असा प्रकार थांबविला असता, असेही मर्केल यांना त्यांनी सांगितले, असे या अहवालात म्हटले आहे.