इंफाळ – मणीपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग याच्या निवासस्थानापासून जवळच असलेल्या यासकुल बसस्थानकाजवळ बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या पॉवरफुल बॉम्बस्फोटात दोन जण ठार तर सात जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. दहशतवाद्यांकडूनच हा बॉम्ब ठेवला गेला असे पोलिसांचे म्हणणे आहे. या स्फोटात १ जण जागीच ठार झाला तर दुसर्याला उपचारासाठी रूग्णालयात नेले जात असताना त्याचा मृत्यू झाला. अन्य गंभीर सात जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
स्फोट होताच तातडीने पोलिस पथक घटनास्थळी आले आणि त्यांनी आसपासच्या परिसराची नाकेबंदी केली. मात्र या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. गेल्या दोन दिवसांतला हा दुसरा स्फोट असून पहिला स्फोट मंगळवारी मुख्यमंत्री निवासस्थान, राजभवन पासून उत्तरेकडे १ किमी वर असलेल्या इंफाळ मार्केट कॉम्प्लेक्समध्ये झाला होता व त्यात ५ जण जखमी झाले होते.
बुधवारचा स्फोट सुरक्षा रक्षकांवर हल्ला करण्यासाठी केला गेला असावा असा पेालिसांचा कयास असून या स्फोटासाठी टायमरचा वापर करण्यात आला होता.