किरणकुमार रेड्डींना २०१४ पर्यंत हवे आहे मुख्यमंत्रीपद

हैदराबाद – आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी सीमांध्र भागात तेलंगण निर्मितीच्या विरोधात उसळलेल्या जनतेच्या असंतोषाचा राजकीय ङ्गायदा घेण्यासाठी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. परंतु त्यांच्या स्वतंत्र पक्षाच्या स्थापनेचा विचार आता बारगळला असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी सोनिया गांधी यांना विधानसभा निवडणुकांपर्यंत आपल्यालाच मुख्यमंत्रीपदावर ठेवावे, अशी विनंती केली आहे.

सीमांध्र भागात जनता खूप प्रक्षुब्ध झालेली आहे. अशा स्थितीत आपले राजकीय भवितव्य काय, या प्रश्‍नाने कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांना ग्रासले आहे. माजी मंत्री जे.सी. दिवाकर रेड्डी, के. सत्यनारायण राजू, डी. माणिक्य वाराप्रसाद राव इत्यादी नेत्यांनी आज त्यांची भेट घेतली आणि आपल्या मनातला संभ्रम त्यांना बोलून दाखवला. आपल्या भावी राजकीय वाटचालीबाबत मुख्यमंत्र्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे असे आवाहन त्यांनी केले आणि ते नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असतील तर आपण त्यांच्या मागे राहू, असे आश्‍वासन त्यांना दिले.

यावर बोलताना किरणकुमार रेड्डी यांनी नव्या पक्षाबद्दल तर काही बोलणे टाळलेच, पण आपण सोनिया गांधी यांना २०१४ सालपर्यंत मुख्यमंत्रीपदावर ठेवण्याची विनंती केली आहे असे सांगितले. याचा अर्थ ते पक्ष सोडणार नाहीत असा होतो आणि मुख्यमंत्र्यांचा हा नवा रंग बघून त्यांचे हे पाठीराखे आणखी संभ्रमात पडले आहेत.