महेबूबनगर- बंगळुरु-हैदराबाद महामार्गावरील महेबूबनगर जिल्ह्यात कोठाकोटा येथे व्होल्वो बसची इंधनाची टाकी फुटल्याने बसला आग लागली. यामध्येा बसमधील ४० प्रवाशांचा मृत्यू झाला. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी गाडीचा चालक, क्लिनर आणि अन्य सहा प्रवाशी बसमधून सुखरुप बाहेर पडले. बसमध्ये ४९ प्रवासी होते. दरम्यान, या अपघातामुळे बंगळुरु-हैदराबाद महामार्गावर प्रचंड वाहतुक कोंडी झाली आहे.
मंगळवारी रात्री हैदराबादमधील जब्बार ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकीची ही एसी व्होल्वो बस बंगळुरुहून हैद्राबादला जाण्यासाठी निघाली होती. ही बस पहाटे महेबूबनगर जिल्ह्यातील कोठाकोटा मंडल भागातील जुवेर्ला येथून जात असताना बसने रस्ता दुभाजकाला धडक दिली. यात बसची इंधन टाकी फुटली. काही क्षणातच बसमध्ये आग लागली. यावेळी गाडीचा चालक, क्लिनर आणि अन्य सहा प्रवाशी बसमधून सुखरुप बाहेर पडले. उर्वरित प्रवाशी पहाटे झोपेत असल्याने त्यांना काही कळायच्या आत आगीचा भडका उडाल्याने ते बसमध्येच अडकले. या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त होत आहे.
या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना प्रथम वनापार्थी येथील सरकारी रुग्णालयात व नंतर हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात हलविण्यात आले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी, तेलगु देशम पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडु यांनी या घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे.