मुंबई- रिपाइंला राज्यसभेची एक जागा सोडण्याची शिफारस महायुतीची समन्वय समिती करणार आहे. महायुतीचे वरिष्ठ नेते त्यावर अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी पत्रकारांना दिली.
मंत्रालयासमोरील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात महायुतीच्या समन्वय समितीची पहिली बैठक पार पडली. लोकसभेच्या जागेचे काहीही होवो; परंतु आता महायुतीच्या नेत्यांनी रिपाइंला राज्यसभेची जागा देण्याची तयारी दर्शवल्याने आठवलेंची खासदारकी पक्की मानली जाते.
रामदास आठवलेंसाठी राज्यसभेची जागा सोडणार
महायुती राज्यात एकत्रितपणे आंदोलनाचे रणशिंग फुंकणार आहे. महागाई, वीज दरवाढ आणि आघाडी शासनाचा भ्रष्टाचार या विषयावर आमची आंदोलने असतील. महायुतीमधील काही जागांची अदलाबदल होऊ शकते, असे तावडे यांनी पत्रकारांना सांगितले.
यापुढे दर १५दिवसांनी अशी बैठक होईल.ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप कार्यालयात निवडणूक समितीची बैठक पार पडली. यावेळी पुणे पदवीधर मतदारसंघामधून विधान परिषदेतील भाजपचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील (कोल्हापूर) यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. नागपूर आणि मराठवाडा पदवीधरच्या जागेसाठीचा निर्णय दिल्लीत होईल, असे सांगण्यात आले.
खासदार होण्याची इच्छा बाळगूनच आठवले महायुतीत आले होते. शिवसेना- भाजपकडे ते वेळोवेळी जागा वाटपाचा लकडा लावत होते. लोकसभेच्या तीन- चार व राज्यसभेची एक जागा मिळावी असे सांगत होते. लोकसभेच्या जागेचे काहीही होवो; परंतु आता महायुतीच्या नेत्यांनी रिपाइंला राज्यसभेची जागा देण्याची तयारी दर्शवल्याने आठवलेंची खासदारकी पक्की मानली जाते. या बैठकीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, संघटन मंत्री रवींद्र भुसारी, आमदार सुधीर मुंगट्टीवार, शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई, माजी मंत्री गजानन किर्तीकर, लीलाधर डाके, रिपाइंचे अर्जुन डांगळे, अविनाश महातेकर, सुमंत गायकवाड आदी उपस्थित होते.