टीम इंडियासाठी आज ‘करो या मरो’

नागपूर- टीम इंडियासाठी आता करो या मरो स्थिती निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरूद़धच्या वन डे सीरिजमधील सहावा सामना बुधवारी नागपूरमध्ये होणार आहे. सात सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलिया २-१ अशी आघाडी घेतली आहे. चौथी आणि पाचवी वन-डे मॅच पावसामुळे रद्द झाल्याने भारताला आता ही मालिका जिंकण्यासाठी पुढच्या दोन्ही मॅच जिंकणे आवश्यक आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सात वन डे सीरिजची सहावी मॅच आज नागपूरच्या जामठा स्टेडियमवर होणार आहे. बुधवारी दुपारी दीड वाजता भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने-सामने असतील. ही मॅच टीम इंडियाला जिंकावी लागणार आहे. जर सहावी वन डे ऑस्ट्रेलियाने जिंकली तर भारताला वन डे मालिका गमवावी लागेल.

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग लाईन अप तुफान फॉर्ममध्ये आहे. जेम्स फॉकनर, जॉर्ज बेली, ग्लेन मॅक्सवेल, अॅरॉन फिन्च आणि फिल ह्युजेस दमदार बॅटिंग करत आहेत. त्यामुळे भारतीय बॅट्समनना आपली पूर्ण ताकद लावून मैदानात उतरावे लागेल. शिखर धवन आणि रोहित शर्मावर खूप महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यांनी जर सुरूवात चांगली केली तर पुढेही चांगले होईल, अशी अपेक्षा आहे. विराट कोहली मधल्या फळीत सातत्यपूर्ण कामगिरी करतोय, तर धोनीच्या बॅटिंगमध्ये टीमला संकटातही तारुन नेण्याची क्षमता आहे. पण सुरेश रैना, युवराज सिंग आणि रवींद्र जाडेजाला मधल्या फळीत रन्स काढण्याची जबाबदारी पार पाडावीच लागेल. रांचीतल्या चौथ्या वन डेत मोहम्मद शमीनं आपल्या धारदार आक्रमणानं कांगारुंना रोखलं होतं. शमीनं आठ ओव्हरमध्ये ४२ रन्स देत तीन विकेट घेतल्या होत्या. शमीपासून सावध राहा असा इशाराचा कॅप्टन जॉर्ज बेलीनं आपल्या बॅट्समनना दिलाय. शमीबरोबरच भुवनेश्वर कुमार, विनय कुमार या मध्यमगती तर अश्विन आणि जाडेजा या स्पिनर्सनाही कांगारुंना रोखावंच लागेल. सर्व क्रिकेट फॅन्सच्या नजरा आज नागपूरकडे लागल्या आहेत.

Leave a Comment