मोदी सुरक्षा – गुजराथ पोलिस पुण्यात हजर

पुणे – पाटणा येथील गांधी मैदानावर नरेंद्र मोदी यांच्या हुंकार रॅलीत झालेले साखळी बॉम्बस्फोट लक्षात घेऊन पुण्यात १ नोव्हेंबरला मोदींच्या होत असलेल्या कार्यक्रमात कांही घातपात होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी गुजराथ पोलिसांचे एक पथक पुण्यात दाखल झाले आहे. पोलिस निरीक्षक ए.एम. पटेल यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या पथकाने पुणे स्थानिक पोलिस अधिकार्‍यांशी चर्चा करून मोदींच्या सुरक्षेबाबत चर्चा केल्याचे समजते.

पाटण्यात सभेमध्येच बॉम्बस्फोट झाल्याने मोदींची सुरक्षा अधिक कडक केली गेली आहे. मोदींच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन यापुढे सुरक्षेबाबत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी गुजराथ पोलिस खबरदारी घेत आहेत. पुण्यात मोदींचा आबासाहेब गरवारे महाविद्यालयात कार्यक्रम असून १ नोव्हेंबरच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणाची तसेच मोदी राहणार असलेल्या जागेची सुरक्षा तपासून त्याचा अहवाल गुजराथ पोलिसांकडून मिळाल्यानंतरच हा कार्यक्रम होणार वा नाही याचा निर्णय घेतला जाणार असल्याचेही समजते.

मोदींना असलेल्या धोक्यासंबंधाने गुप्तवार्ता विभागानेही अॅलर्ट जारी केले आहेत. त्यामुळे पुणे पोलिसही त्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक काळजी घेत असून कार्यक्रमस्थळी क्वीक रिस्पॉन्स टीम तैनात करण्यात येत आहे. त्याचबरोबर बॉम्ब शोध पथके व बॉम्ब निकामी पथकेही तैनात करण्यात येणार आहेत. कार्यक्रमापूर्वी ही जागा संपूर्णपणे तपासली जाणार असल्याचे वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडून सांगितले जात आहे. मोदींचा कार्यक्रम होईपर्यंत गुजरात पोलिस पथक पुण्यातच थांबणार असून कार्यक्रम झाल्यानंतर ते गुजराथला परतणार आहे.

Leave a Comment