पाटणा – जेडीयूच्या चिंतन शिबीरात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदींच्या खोटेपणाचा पाढाच वाचला. कालपर्यंत सगळे गुण दिसत होते आता अचानक सगळेच अवगुण दिसू लागले, असे सांगून नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. मोदींची हुंकार रॅली ही हुंकार रॅली नाही, तर अहंकार रॅली आहे. बिहारींच्या योगदानाशिवाय आणि मेहनतीशिवाय गुजरातचा विकास झाला नसल्याचेही यावेळी नितीशकुमार यांनी सांगितले.
ज्यांनी जेंपीना सोडले त्यांनी बीजेपीला सोडल्यास नवल ते काय? असा सवाल नरेंद्र मोदींनी केला होता. त्याचा समाचार घेताना नितीशकुमार यांनी जेपींना कधी सोडले?, असा सवाल उपस्थित केला. गुजरातमध्ये देशातील सगळ्या जास्त आईस्क्रीम विकले जाते, त्यामुळे वाणीतही थोडा गोडवा आणा, अशा प्रकारे नितीश यांनी मोदींना सल्ला दिला.
तसेच पंतप्रधानपदाच्या उमेदवाराने थोडं धीराने वागायला हवे, असा सल्लाही यावेळी नितीश यांनी दिला. त्याचप्रमाणे पंतप्रधानांच्या आमंत्रणावरुन नरेंद्र मोदींसोबत कधीच भोजन केले नसल्याचे सांगत नितीशकुमारांनी मोदींना खोटे ठरवले.