दाऊद इब्राहिमला कपिलने ड्रेसिंग रुममधून हाकलले होते – वेंगसरकर

मुंबई – भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी मॅच फिक्सिंगसंबंधी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. 1984 मध्ये शारजा येथे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने टीम इंडियाला मोठी ऑफर देत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न केला होता. मात्र संघाचा तत्कालीन कर्णधार कपिल देव याने दाऊदची ऑफर धुडकावून लावली होती. इतकेच नव्हे तर कपिलने हा माणूस कोण आहे; असे म्हणत त्याला ड्रेसिंग रूमच्या बाहेर हाकलले होते.

दाऊद फार पूर्वीपासून मॅच फिक्सिंगमध्ये सक्रिय असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना वेंगसरकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना हा गौप्यास्फोट केला. 1984 मध्ये भारत – पाकिस्तान यांच्यातील शारजा कप या सामन्यासाठी भारतीय संघ पाकीस्तानात गेला होता. यावेळी दाउद इब्राहिम भारतीय क्रिकेट टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये आला होता. जर तुम्ही पाकिस्तानला हरवलंत तर मी सगळ्या खेळाडुंना टोयोटा करोला कार भेट देईन असे दाउदने सांगितले. त्याचवेळी कर्णधार कपिलदेव ड्रेसिंग रूममध्ये आला.

ये आदमी कौन है, और यहाँ क्या कर रहा है, असे म्हणत कपिलने दाउदला ड्रेसिंग रूमच्या बाहेर हाकले. बाहेर हाकलल्याने रागावलेल्या दाउद जाता जाता वो कार की बात कॅन्सल असे म्हणाला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना कपिल देवने सांगितले की, ड्रेसिंग रूममध्ये आलेली ती व्यक्ती कोण होती हे मला माहीत नव्हतं. खेळाडूंशिवाय इतरांना ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश नसतो, त्यामुळे मी त्यावेळी हजर असलेल्या व्यक्तीला बाहेर काढले. नंतर मला सांगण्यात आले की तो दाऊद इब्राहिम होता, असे कपिल देव म्हणाले. हा प्रकट मुलाखतीतला एक किस्सा असला तरी, तो मॅच फिक्सिंग सारख्या एका गंभीर विषयाशी निगडीत मोठा गौप्यस्फोट आहे. यामुळे निश्चितच हा चर्चेचा विषय ठरणार आहे.

Leave a Comment