तलावातील कमळे झाकण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी!

जबलपूर – शरद ऋतुच्या आगमनाने मध्यप्रदेशमधील तलाव कमळांनी बहरली आहेत. मात्र ही सुंदर फुले मध्यप्रदेश काँग्रेसच्या डोळ्यात खुपू लागली आहेत. मध्यप्रदेशात सध्या निवडणुकीचा आखाडा रंगला आहे. विधानसभा निवडणुकीत या फुलांमुळे भाजपचा प्रचार होईल असा तर्क लढवत मध्यप्रदेश काँग्रेसने या फुलांना झाकावे अशी अजब मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

आता काँग्रेसचे स्थानिक नेते अमरचंद यांनी ही अजब मागणी करुन सर्वांनाच अचंबित केले आहे. शरद ऋतुमध्ये कमळांच्या फुलांना बहर येतो. राज्यातील सुमारे 40 मतदारसंघात कमळाची शेती केली जाते. महाकौशल, मालवा आणि बुंदेलखंड येथील तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात कमळाची फुले उमलतात. ही कमळाची फुले दररोज मतदारांच्या नजरेत आल्यास त्याचा फायदा भाजपला होईल. असा दावा करत अमरचंद यांनी तलावातील कमळे झाकण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

निवडणूक आयोगाकडे एका पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे. या मागणीबाबत मध्यप्रदेश भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निराशावादी मानसिकतेमुळेच काँग्रेसने ही अजब मागणी केल्याचे भाजपचे म्हणणे आहे. तलावात नैसर्गिकरित्या बहरणारे कमळाचे फुल झाकले तर मग प्रत्येकांच्या हाताचा पंजा’ही निवडणुकीच्या काळात झाकून ठेवावा लागेल असा टोला भाजपचे प्रवक्ते विश्वास सारंग यांनी लगावला आहे.

निवडणूक आयोगाचे अधिकारीही काँग्रेसच्या या अजब मागणीने चक्रावून गेले असून काँग्रेसच्या मागणीवर विचारविनीमय करण्यासाठी स्थानिक अधिका-यांनी वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा सुरु केली आहे. याबाबत निवडणूक आयोगाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

Leave a Comment