बिहारला सर्तकतेची सूचना दिली होती

नवी दिल्ली – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी बिहार सरकारला सर्तकतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या असे केंद्र सरकारने मंगळवारी सांगितले. बिहार सरकारला नरेंद्र मोदी यांची सभा दहशतवाद्यांकडून लक्ष्य होण्याची शक्यता असल्याची कल्पना देण्यात आली होती असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.

सर्तकतेची सूचना सामान्य होती कि, विशेष ही बाब वेगळी. पण कुठल्याही राज्यात अशी मोठी सभा असते तेव्हा त्या राज्यांना, दहशतवादी हल्ल्यापासून सावध रहाण्याची सूचना दिली जाते असे शिंदे यांनी सांगितले.

केंद्र सरकारने बिहार सरकारला दहशतवादी हल्ल्याची पूर्वकल्पना दिली होती का ? या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी ही माहिती दिली. कुठल्याही मोठया सभेपूर्वी त्या राज्याला दोन ते तीन दिवस आधी सर्तकतेची सूचना दिली जाते. राज्य पोलिसांना सभा स्थळी सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यास सांगितला जातो असे शिंदे यांनी सांगितले.

सुशीलकुमार शिंदे मंगळवारी बिहारमधील सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी तेथे जाणार होते. मात्र बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार बुधवारी दिल्लीला येऊन त्यांना बिहारमधील परिस्थितीची माहिती देणार आहेत त्यामुळे त्यांनी मंगळवारचा नियोजित दौरा रद्द केला.