सचिनच्या १९९ व्या टेस्टमॅचसाठी ईडन गार्डन सज्ज

कोलकाता- कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या १९९व्या टेस्टमॅचसाठी ६ नोव्हेंबरला उतरणार आहे. यावेळी सचिनवर १९९ किलो गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जाणार आहे. त्याहनंतर सचिन मुंबईत २००वी मॅच खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. त्याआधी १९९वी मॅच म्हणजे सचिनची ईडन गार्डनवरची अखेरचा सामना आहे. या मॅचची ईडन गार्डनवर जय्यत तयारी करण्यात आली आहे.

ईडन गार्डनवर सचिन ६ ते १० नोव्हेंबर दरम्यान १९९वी टेस्ट मॅच खेळेल. तर मुंबईत वेस्ट इंडिज विरुद्ध १४ नोव्हेंबरला सचिन आपल्या कारकीर्दीची अखेरची मॅच खेळणार आहे. सचिनच्या करिअरची ही २००वी टेस्ट मॅच आहे. बंगाल क्रिकेट संघानं या महान क्रिकेटपटूला निरोप देण्याची पूर्ण तयारी केली आहे.

टेस्ट मॅच बघायला येणा-या जवळपास ६५ हजार प्रेक्षकांना सचिनचे मास्क आणि प्लेकार्ड दिले जाणार आहे. सीएबीचे कोषाध्यक्ष विश्वरुप डे म्हणाले की, सचिनची ईडन गार्डनवरची अखेरची मॅच बघण्यासाठी ६५ हजार प्रेक्षक येण्याची शक्यता आहे. टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी सचिनचा मास्क दिला जाईल. तर दुस-या दिवशी सचिनच्या सन्मानार्थ लिहीलेलं प्लेकार्ड दिलं जाईल. तिस-या दिवशी जेव्हा सचिन स्टेडिअमवर उतरेल तेव्हा १९९ फुगे आकाशात सोडले जातील. या फुग्यांवर सचिनचा फोटो आणि स्लोगन लिहीलेले असेल. चौथ्या दिवशी सचिनला समर्पित प्रसिद्ध व्यक्तींनी लिहीलेल्या लेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन केलं जाईल. तर पाचव्या आणि अखेरच्या दिवशी सचिनवर गुलाबाच्या फुलांच्या १९९ किलो पाकळ्यांची त्याच्यावर उधळण केली जाईल.

Leave a Comment