ओबामांना मर्केल यांच्याबद्ल नव्हता विश्वास

बर्लिन – अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांच्याविषयी विश्वास वाटत नव्हता म्हणूनच गुप्तवार्ता विभागाने आणि राष्ट्रीय सुरक्षा संस्थेतर्फे मर्केल यांच्याविरोधात केल्या जात असलेल्या हेरगिरीबाबत पूर्ण कल्पना असूनही ओबामांनी त्याला आक्षेप घेतला नाही असा गौप्यस्फोट जर्मनीतील  वृत्तपत्राने केला आहे.

अमेरिकेच्या या हेरगिरी प्रकरणामुळे अनेक मित्ररराष्ट्रे अमेरिकेवर टीकेचा भडीमार करत आहेत मात्र त्यातही जर्मनीने या टीकेची धार अधिक तीव्र केली आहे. जर्मन वृत्तपत्राने केलेल्या गौप्यस्फोटानुसार अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेची विशेष शाखा, स्पेशल कलेक्टीव्ह सर्व्हीस ही बर्लीन जवळ असलेल्या अमेरिकन दुतावासात कार्यरत असून  २००२ पासूनच मर्केल यांचे नांव त्यांच्या लिस्टवर होते. एनएसएचे प्रमुख अलेक्झांडर यांनी २०१० सालीच ओबामा यांना मर्केल यांच्यावर केल्या जात असलेल्या हेरगिरीची कल्पना दिली होती मात्र ओबामा यांनी त्यांना अशी हेरगिरी करण्यापासून थांबविले तर नाहीच तर उलट मर्केल यांच्याबद्दल अधिकाधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला.

मर्केल यांनी त्यांच्या ईमेल आणि फोन हॅक केल्याप्रकरणात संतप्त होऊन ओबामा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्याबाबत स्पष्टीकरण मागितले होते व तेव्हा ओबामा यांनी असा प्रकार होत असल्याची कल्पना त्यांना नव्हती अन्यथा त्यांनी तो त्वरीत थांबविला असता असे उत्तर दिले होते. अमेरिकेने या संस्थाच्या मदतीने जगभरात कुठेही नेांद न झालेले ८० गुप्तहेर पेरले असून राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून आत्तापर्यंत ७० दशलक्ष कॉल व टेक्स्ट मेसेज ट्रॅक केले गेले आहेत असेही समजते.

Leave a Comment