आंध्रातील अभियांत्रिकी महाविद्यालये अडचणीत

हैदराबाद – एकेकाळी अभियांत्रिकी महाविद्यालयांची प्रचंड संख्या असलेले राज्य म्हणून आंध्र प्रदेशाकडे बघितले जात होते. ७०० अभियांत्रिकी महाविद्यालये असणार्‍या या राज्यात अनेक महाविद्यालयांनी यावर्षी पुरेसे प्रवेश झाले नसल्यामुळे राज्य सरकारकडे महाविद्यालये बंद करण्याची अनुमती मागितली आहे. २५० महाविद्यालयांना यावर्षी १०० सुद्धा विद्यार्थी मिळालेले नाहीत. १३ महाविद्यालयात एकही विद्यार्थी आला नाही. त्यामुळे आर्थिक उलाढालीचे हे मोठे केंद्र आता विकलांग झाल्याचे दिसत आहे.

राज्यात ६०९ खाजगी आणि ८१ अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. या सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आंध्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या तिन्ही राज्यातील विद्यार्थ्यांची मोठी स्पर्धा चालत असे. परंतु यावर्षी चित्र बदलून गेले आहे. हैदराबाद शहर आणि परिसरात ४० अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत, परंतु यावर्षी या सर्व महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला आहे आणि त्यांनी महाविद्यालये बंद करण्याची अनुमती सरकारकडे मागितले आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयांना आणि तंत्रशिक्षण संस्थांना अनुमती देण्याचा अधिकार असलेल्या ऑल इंडिया कौन्सिल ङ्गॉर टेक्नॉलॉजिकल एज्युकेशन या संस्थेने १४ राज्यातील १४३ तंत्रशिक्षण संस्थांना महाविद्यालये बंद करण्याची परवानगी दिली. त्यातली ५६ महाविद्यालये एकट्या आंध्रातली आहेत.