मध्य प्रदेश : कॉंग्रेस संभ्रमात

भोपाळ – मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या हाती सत्ता आल्यास मुख्यमंत्री म्हणून कोणाच्या हाती सूत्रे द्यावीत, किंबहुना निवडणुकीच्या प्रचारातच कोणत्या नेत्याला प्रोजेक्ट करावे याबाबत कॉंग्रेस पक्षामध्ये संभ्रमाची अवस्था आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर नेतृत्वाची धुरा सोपवावी असा विचार पक्षात पुढे आला होता. परंतु त्यांना दिग्विजयसिंग यांचा विरोध होईल असे दिसताच शिंदे यांचे नाव मागे पडले. पक्षाची गटबाजीतून सुटका होत नाही हे कटुसत्य कॉंग्रेसला पचावावे लागत आहे.

मध्य प्रदेशात कॉंग्रेस पक्ष अनेक गटात विभागलेला आहे. ज्योतिरादित्य शिंदे, दिग्विजयसिंग, कमलनाथ, सत्यव्रत चतुर्वेदी, कांतिलाल भुरिया इत्यादी नेत्यांचे वेगवेगळे तंबू पक्षात उभारलेले आहेत. त्यांचे आपापसातले हेवेदावे एवढे तीव्र आहेत की, कॉंग्रेसला या निवडणुकीत विजय मिळाला तर ते आश्‍चर्यच ठरेल असे कॉंग्रेसच्याच एका नेत्याने म्हटले आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांना कॉंग्रेस पक्षाने प्रचारात पुढाकार घेण्याची सूचना केली. त्यांनी सुद्धा निरनिराळ्या गटांच्या नेत्यांना सोबत घेऊन राज्यात ३२ जिल्ह्यात दौरे केले. प्रत्येक सभेच्या शेवटी सर्व गटाच्या नेत्यांनी हात उंचावून ऐक्याचे प्रदर्शन केले. परंतु संभाव्य मुख्यमंत्री म्हणून कोणत्याही एका नेत्याचे नाव जाहीर झाल्यास पक्षाचे हे ऐक्य टिकेल की नाही याबाबत कॉंग्रेस श्रेष्ठींना चिंता वाटते.

ज्योतिरादित्य शिंदे हे विजयाराजे शिंदे यांचे नातू आणि माधवराव शिंदे यांचे चिरंजीव आहेत. ते सलग तीन वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी मतदारात आकर्षण निर्माण होत आहे. त्यांच्या सभांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. परंतु त्यांच्या विरोधी गटातले कॉंग्रेसचे नेते त्यांना मनापासून सहकार्य करून पक्षाचा आवाज बुलंद करतील अशी शक्यता नाही.

Leave a Comment