हॅकर्सचे विश्‍व उलगडणारा व्हायरस

बॉलिवुडचे चित्रपट निर्माता, दिग्दर्शक  अलिकडच्या कळात विविध विषयांची हाताळणी करीत आहेत. बदलत्या काळानुरूप विषयांची मांडणी होत आहे. यामुळे तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर चित्रपटातून होत असल्याचे दिसते. आजचा जमाना कंप्युटर, मोबाईल, इंटरनेट, अ‍ॅप, सोशल नेटवर्किंग साईटचा आहे; तेव्हा चित्रपटवाले त्यात मागे कसे राहतील?  ‘मिकी व्हायरस’ या चित्रपटात हॅकिंग या विषयाचा रहस्यमय कानोसा दिग्दर्शकाने घेतला आहे.

‘मिकी व्हायरस’ ही मिकी अरोरा (मनीष पॉल) नावाच्या युवकाची कथा आहे. दिल्लीत पंधरा दिवसांच्या अंतराने दोन हॅकर्सची हत्या होते. या हत्येचा तपास  एसीपी सिद्धांत  (मनीष चौधरी) यांच्याकडे येतो. हॅकर्सच्या हत्येचे गूढ उकलण्यासाठी सिद्धांत एका हॅकरची मदत घेण्याचे ठरवतो. इन्स्पेक्टर भल्ला (वरुण बडोला) याकामी सिद्धांतच्या बरोबर असतो. ते दोघे मिळून हॅकर्सच्या विश्‍वात उगवता तारा असलेल्या मिकीची या कामासाठी निवड करतात.  मिकी आपली मैत्रीण चटणी (पूजा गुप्ता), मित्र फ्लॉपी (राघव कक्कर) आणि पंचो (विकेश कुमार) यांच्याबरोबर कंप्युटरविश्‍वात विविध गोष्टी करण्यात मग्न असतो. मात्र त्याला कमिटमेंट करून काम करण्याचा कंटाळा येतो. अशा  मिकीला पोलिस कामाला लावतात. दरम्यानच्या काळात कामायनी (इली अवराम) मिकीच्या आयुष्यात येते. कामायनी एका खासगी बँकेत  काम करीत असते. एका आणीबाणीच्या क्षणी मिकी कामायनीच्या सांगण्यावरून त्या बँकेची साईट हॅक करतो आणि त्याच रात्री कामायनीचा खून होतो.

 
मिकीने ज्या खात्यातील पैसे पळवले आहेत ते खाते मंत्र्यांचा दलाल असलेल्या अन्वर राजाचे आहे आणि मिकीने त्याच्या बँक खात्यातील 100 कोटी रुपये हॅक केल्याचे उघड होते. या प्रकरणाचा तपासही  एसीपी सिद्धांतकडे येतो. या प्रकरणाची तपासणी सुरू असताना मिकीला आपण हॅकर्सच्या जाळ्यात फसल्याचे लक्षात येते. सर्व पुरावे मिकीच्या विरोधात असतात. मिकी त्या हॅकर्सच्या टोळीचा पर्दाफाश करण्याचे ठरवतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सापडलेला मिकी या टोळीचा भांडाफोड करण्यात यशस्वी होतो का? या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी मिकी व्हायरसला मोठ्या पडद्यावर भेट द्यायला हवी.
 
दिग्दर्शक सौरभ वर्माने आजच्या तरुणाईला खिळवून ठेवेल, असा विषय निवडला आहे. सायबर क्राइम या गंभीर विषयाला रहस्याची उत्तम जोड देण्यात तो यशस्वी झाला आहे. पुढे काय होणार याची उत्सुकता सतत वाढत जाते. कोण आरोपी असेल, कोण खुनी असेल याचे तर्कवितर्क प्रेक्षक बांधू लागतो. मध्यंतरानंतर पटकथा अधिक वेगवान आहे.  अकरा तासात आरोपी शोधून काढायचे, असे एसीपी सिद्धांत ठरवतो. तेव्हा कथेचा वेग कुठेही कमी होणार नाही आणि प्रेक्षकांचा फार गोंधळ उडणार नाही, याची दिग्दर्शकाने पुरेपूर काळजी घेतली आहे. प्रत्येक पात्राच्या तोंडी तरुणाईला व विषयाला शोभतील असे संगणकीय भाषेतील संवाद आहेत. त्यामुळे प्रेक्षक विषयाशी शेवटपर्यंत  जोडला गेला आहे.
 
मिकी व्हायरसच्या मुख्य भूमिकेत असलेल्या मनीष पॉल आणि इली अवराम यांचा हा पहिलाच चित्रपट. मात्र, दोघांनीही ते जाणवू दिलेले नाही. सर्वसामान्य चेहरा हा मनीषचा प्लस पॉइंट ठरला आहे. विनोदाची  खरी मजा आणतात ते मनीष चौधरी आणि वरुण बडोला हे दोघे. मनीष चौधरीचा एसीपीही लक्षात राहणारा आहे.  चित्रपटाच्या सुरवातीला असलेला प्यार चायना का माल’ हे गाणं विषयाची व्याप्ती समजावून देण्यात यशस्वी झाले आहे. इतर गाणीही पटकथेला पूरक आहेत.हॅकर्सचे अतिशय क्लिष्ट विश्‍व सामान्य प्रेक्षकाला डोळ्यासमोर ठेवून दिग्दर्शकाने पडद्यावर साकारले आहे.  रहस्य उलगडताना धक्कातंत्राचा केलेला वापर चांगला आहे. एकंदरीत हॅकिंग आणि हॅकर्सचे अंतरंग उलगडून दाखवणारा मिकी व्हायरस आपल्या डोक्यात अपलोड करून घ्यायला हरकत नाही.
 
चित्रपट – मिकी व्हायरस
निर्मिती – अरुण रंगाचारी, विवेक रंगाचारी
दिग्दर्शक – सौरभ वर्मा
संगीत – हनिफ शेख
कलाकार – मनीष पॉल, इली अवराम, मनीष चौधरी, वरुण बडोला, पूजा गुप्ता
  रेटिंग – * * *

 

Leave a Comment