पुणे विद्यापीठाचा नामांतराचा प्रस्ताव मंजूर

पुणे – शिक्षणाचं माहेर घरं म्हणजे पुणे आणि त्याच पुण्यात महिलांसाठी पहिली शाळा उघडून महिलांना ज्ञानामृत देणार्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव अखेर पुणे विद्यापीठाला देण्याचं ठरलंय. पुणे विद्यापीठाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असं नाव देण्याचा प्रस्ताव सिनेटने एकमताने मंजूर केलाय.

तब्बल 9 वर्षांच्या संघर्षानंतर नामांतर समितीला यश आलं असून आता हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवणार आहे. पुण्यात भिडे वाड्यात सावित्रीबाईंनी महिलांसाठी शिक्षणाची ज्योत पेटवली होती. संपुर्ण भारतात ती पहिली महिलांसाठी शाळा होती. सावित्रीबाई स्वत: त्या शाळेत महिलांना शिकवत असतं. पुणे शिक्षणाचं माहेर घरं, सांस्कृतिक शहर म्हणून नावारुपास आलं.

2004 साली नामांतर समिती आणि विविध पक्षांनी विद्यापीठाला सावित्रीबाईंचं नाव द्यावं अशी मागणी केली. यासाठी नामांतर समितीने वेळोवेळी आंदोलनं केली. मोठ्या संघर्षानंतर अखेर तो दिवस आता जवळ आलाय. आज विद्यापीठात झालेल्या अधिसभेत सिनेटनं इतकी वर्ष बारगळलेल्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. आता हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. राज्य सरकारने शिक्कामोर्तब केल्यानंतर पुणे विद्यापीठाचं नाव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असं होईल.

Leave a Comment