आयएसआय स्टोरी : पो. अधिकार्‍याचा उपद्व्याप

जयपूर – मुझफ्ङ्गरनगर दंगलीतील पीडित तरुणांशी पाकिस्तानातील आयएसआय ही संस्था संपर्कात असल्याची माहिती राहुल गांधी यांना राजस्थानातल्या एका पोलीस अधिकार्‍याने दिली आहे. हा पोलीस अधिकारी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळविण्यास इच्छुक आहे आणि त्यासाठी राहुल गांधींना खूष करण्याकरिता म्हणून त्यांनी ही माहिती राहुल गांधींना दिली आणि राहुल गांधींनी त्यावर विश्‍वास ठेवून भाषणात तिचा वापर केला, असा आरोप भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील जयपूर येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना केला.

नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्या या विधानाचा समाचार घेण्याची ही दुसरी वेळ आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या या विधानामुळे केंद्र सरकार अडचणीत आले आहे. कारण कायद्याच्या दृष्टीने विचार केला तर एका पोलीस अधिकार्‍याने अशी माहिती राहुल गांधी यांना देण्याची गरज नाही. कारण राहुल गांधी केवळ खासदार आहेत. जर या अधिकार्‍याने अशी माहिती दिली असेल तर तो त्याचा गुन्हा ठरतो. राहुल गांधी हे मंत्री नसल्यामुळे अशा प्रकारची माहिती जाहीरपणे न सांगण्याची शपथ त्यांनी घेतलेली नाही. परंतु अशी माहिती आपल्याला मिळाली असल्यास ती जाहीर करू नये, एवढेही तारतम्य त्यांना नाही.

मुझफ्ङ्गरनगर दंगल भाजपाने घडवली आहे, असा कॉंग्रेसचा आरोप आहे आणि त्या दंगलीचा परिणाम म्हणून मुस्लीम तरुण आयएसआयच्या नादी लागत आहेत. एकंदरीत भाजपामुळे देशातली दहशतवादी चळवळ वाढत आहे, असा आरोप राहुल गांधी यांना करायचा होता. परंतु तो करताना त्यांनी तारतम्य पाळले नाही आणि ते निष्कारणच वादाच्या भोवर्‍यात सापडले. दरम्यान या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्याची तयारी भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे.

मुळात राहुल गांधी यांना अशी काही माहिती मिळालीच नसेल, परंतु भाजपाला दोष देण्यासाठी त्यांनी ही बनावट कहाणी रचली असेल अशीही शक्यता आहे. परंतु ही कथा रचताना त्यांनी मुस्लीम युवक आयएसआयशी हातमिळवणी करतात, असे नकळतपणे सूचित केले आहे आणि त्यामुळे मुस्लीम समाजात नाराजी पसरू शकते. किंबहुना नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाला तसे वळण दिले आहे आणि कॉंग्रेसच्या नेत्यांना सारवासारवी करता करता नाकीनव येत आहेत.

Leave a Comment