
हैदराबाद – ङ्गायलीन वादळानंतर आलेल्या मुसळधार पावसाने आंध्र आणि ओदिशाच्या मोठ्या भूभागाला ङ्गटका बसला असून या दोन राज्याच्या ३० जिल्ह्यातील शेकडो गावे जलमय होऊन उर्वरित जगापासून तुटली आहेत. या जिल्ह्यातील रस्ते आणि रेल्वेमार्ग पूर्णपणे बंद झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. या दोन राज्यात या नैसर्गिक आपत्तीने ४५ लोक मरण पावले आहेत. या पावसाचा तडाखा पश्चिम बंगाललाही बसला आहे. राज्याच्या दक्षिण भागातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे घरे कोसळली आहेत. कोलकत्ता शहर आणि परिसरात जनजीवन विस्कळीत झाली आहे.
या तीन राज्यांमध्ये सुरू असलेली ही आपत्ती कमी होण्याऐवजी अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. कारण हवामान खात्याने येत्या ४८ तासात या तिन्ही राज्यांना मुसळधार पावसाचा ङ्गटका बसेल असा अंदाज व्यक्त केला आहे. आंध्र प्रदेशातील ३,२३० गावे जगापासून तुटली असून ६,६०० घरे कोसळली आहेत.
आंध्र प्रदेशातील आपतकालीन व्यवस्थापन आयुक्त टी. राधा यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ४०५ लघु पाटबंधारे प्रकल्प मर्यादेपेक्षा अधिक भरल्यामुळे तुटले आहेत. पिकांचे तर नुकसान झाले आहेच, पण ९३५ कि.मी. लांबीचे रस्ते पूर्णपणे धुतले गेले आहेत. राज्याच्या नऊ जिल्ह्यातील ७२ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले आहे. ६ लाख ७७ हजार एकर जमिनीतील पिके नष्ट झाली आहेत. आपतग्रस्तांसाठी १७८ निवारा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ओदिशातील संकट यापेक्षा गंभीर आहे.