
डॉक्टरांना पेशंट हा देव मानतो पण डॉक्टर त्याच्याशी कशी वागणूक करतो ? तो पेशंटाकडे पैसे लुटण्याचे एक साधन म्हणून पाहतो. अशा डॉक्टरांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना कायद्याच्या कचाट्यात पकडून कठोर शासन करायलाच हवे. कारण डॉक्टरी व्यवसायात एक विकृती शिरली आहे. ज्यांनी आपला व्यवसाय सेवा म्हणून करायला हवा ते लोक तो व्यवसाय धंदा म्हणून करायला लागले आहेत. धंदा म्हटले की, त्या धंद्यातली स्पर्धा जिंकण्यासाठी वाट्टेल ते करणे हे अपरिहार्यच असते. पण ही प्रवृत्ती डॉक्टरांत दिसायला लागते तेव्हा चिंता वाटायला लागते. डॉक्टर, पत्रकार, साधू, शिक्षक यांच्यांकडे समाज आदराने बघत असतो पण हेच लोक माणुसकी सोडून वागायला लागले की सामान्य माणसाचा माणुसकीवरचा विश्वास उडतो. सामान्य माणूस आपला जीव आणि आरोग्य डॉक्टरच्या हातात सोपवत असतो. ते डॉक्टर धंदा करण्याच्या नादात भलतेच काही करायला लागले तर पेशंटवर जीव गमवायचंी पाळी येते. या डॉक्टरांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव देणार्या काही घटना घडतात आणि बेजबाबदारपणे व्यवसाय करणार्या डॉक्टरांचे डोळे उघडतात. सर्वोच्च न्यायालयाने काल या क्षेत्रातला मैलाचा दगड ठरेल असा एक निकाल दिला असून एका अनिवासी भारतीय महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल एका रुग्णालयाला चक्क ११ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
डॉक्टरांनी योग्य तो उपचार न केल्यामुळे मरण पावलेल्या अनुराधा सहा या महिलेच्या पतीने तिच्या मृत्युनंतर प्रदीर्घ काळ कायद्याचा लढा दिला. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने त्याला न्याय दिला. कोलकात्याच्या ऍडव्हान्स मेडिकेअर आणि रिसर्च सेंटर या रुग्णालयात ही महिला दाखल झाली होती. तिला त्वचेच्या ऍलर्जीचा त्रास होता. डॉक्टरांनी त्यासाठी तिला दिलेल्या इंजेक्शनची मात्रा एवढी जबरदस्त होती की तिच्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला. भारतात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अनेक जण जीवास मुकतात. पण मरण पावणार्या रुग्णांचे नातेवाईक रुग्णाच्या मृत्यूस डॉक्टरला दोषी धरत नाहीत तर नशिबाला दोष लावतात. शेवटी प्रत्येक माणूस मरणार असतोच परंतु काही वेळा इलाज होऊन रुग्ण जगण्याची शक्यता असते. पण डॉक्टर काळजीपूर्वक इलाज करत नाहीत म्हणून रुग्ण मरतो. अशा वेळी डॉक्टरला न्यायालयात खेचले पाहिजे परंतु सामान्य माणसाला तेवढी पोच नसते. म्हणून डॉक्टरही निष्काळजीपणा करत असतात.
कोलकात्याच्या या प्रकरणात मात्र मरण पावलेली महिला ती उच्चशिक्षित मानसोपचार तज्ञ होती आणि तिचा पती कुणाल सहा हा स्वतः डॉक्टर आणि संशोधक आहे. त्याने डॉक्टरांनी केलेल्या उपचारातील चूक लक्षात आल्यामुळे डॉक्टरांविरुध्द ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये तक्रार गुदरली. ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या सर्वोच्च मंडळाने त्यांचे म्हणणे मान्य केले आणि डॉक्टरांनी त्यांना १ कोटी ७२ लाख भरपाई द्यावी असा आदेश दिला. डॉक्टरांना आणि रुग्णालयाला तर हा निर्णय मान्य नव्हताच. पण कुणाल सहा याला निर्णय मान्य असूनही भरपाईची रक्कम मान्य नव्हती. म्हणून या दोघांनीही सर्वोच्च न्यायालयात अपील केेले. सहा यांनी ७७ कोटी रुपयांची भरपाई मागितली. न्यायालयाने मात्र ११ कोटी रुपयांची भरपाई मंजूर केली. भारतामध्ये तरी एवढ्या रकमेचा दावा एकही झालेला नाही. त्यामुळे हे प्रकरण सध्या भारतात गाजत आहे. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने काही टिप्पणी केलेली आहे. सामान्य माणूस डॉक्टरांकडे वेदनेपासून मुक्ती मिळवून देणारा देवदूत म्हणून पाहत असतात. परंतु कमालीचे धंदेवाईक झालेल्या डॉक्टरांना रुग्णांच्या या भावनेची कदर नसते. त्यांचे सारे लक्ष पेशंटच्या खिशाकडे असते. त्या खिशातून भरपूर पैसा काढूनसुध्दा बरेचसे डॉक्टर प्रामाणिकपणे चांगला इलाज करत नाहीत. अशा डॉक्टरांना शिक्षा झालीच पाहिजे. असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.
चांगले आरोग्य आणि त्यात बिघाड झाल्यास उत्तम उपचार हा सामान्य माणसाचा मूलभूत अधिकार आहे. परंतु मेडिकल कौन्सील सारख्या संस्था या हक्कामागची मानवी भावना ओळखू शकत नाहीत. त्यामुळे भारतामध्ये रुग्णांचे अधिकार आणि डॉक्टरांची कर्तव्ये यांच्या बाबतीत म्हणावे तेवढे परिणामकारक कायदे करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हा निकाल देताना न्यायमूर्ती गोपाळ गौडा आणि सी. के. प्रसाद यांनी विविध राज्य सरकारे आणि केंद्र सरकार यांना असे कायदे करण्याची आवाहन केले आहे. डॉक्टर मंडळी आपले कर्तव्य करताना चुकत असतील तर त्यांच्याविरुध्द ङ्गारच कठोरपणे कारवाई केली गेली पाहिजे असे न्यायालयाने आवर्जुन म्हटले आहे. भारतामध्ये मुळात डॉक्टरांना न्यायालयात खेचावे की नाही हाच वादाचा मुद्दा होता. पण तो मागेच निकाली निघाला आहे आणि आता तर सर्वोच्च न्यायालयाने बेपर्वा डॉक्टरांना हा दणका दिला आहे. या पासून डॉक्टर मंडळी काही धडा घेतील अशी आशा करू या. आपल्या देशात वैद्यकीय उपचार महाग आहेतच पण ते बेदरकार होता कामा नयेत याची तरी काळजी घेतली गेली पाहिजे.