बर्लिन – अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने जर्मन चान्सेलर अॅजेला मार्केल यांच्या फोनवरही नजर ठेवल्याच्या प्रकाराची जर्मन सरकारने गंभीर दखल घेतली असून त्या संदर्भात तपास आणि बोलणी करण्यासाठी जर्मनीच्या गुप्तवार्ता विभागातील टॉप अधिकारी वॉशिग्टनला जाणार आहेत. त्यावेळी ते व्हाईट हाऊस तसेच राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेतील अधिकार्यांणसोबत बोलणी करणार असल्याचे सांगितले जात आहे. चॅन्सेलर अँजेला यांच्या फोनवर ठेवल्या गेलेल्या नजरेबाबत यावेळी उत्तर मागितले जाणार असल्याचेही समजते.
एडवर्ड स्नोडेन याने राष्ट्रीय सुरक्षा संस्थेसाठी काम करताना कांही अति महत्त्वाची कागदपत्रे उघड केली होती. त्याने नुकत्याच उघड केलेल्या माहितीनुसार जर्मनी, फ्रान्सच्या प्रमुखांसह सुमारे ३५ देशांच्या प्रमुखांच्या फोनवर या संस्थेने नजर ठेवली होती. त्यांचे इमेल अकौंटही चेक केले जात होते. या संदर्भात जर्मन चान्सेलर मार्केल यांनी मित्रांत हेरगिरी मान्य नसल्याचे मत नोंदविताना मित्रांत विश्यास हवा आणि अमेरिकेने तो गमावला असून तो परत प्रस्थापित व्हायला हवा असे कडक मत व्यक्त केले होते.
फ्रान्सनेही अमेरिकेच्या या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली असून फ्रान्स व जर्मनीने अमेरिकेने नो स्पाईंग अग्रीमेंट करार या वर्षअखेर करावा अशीही मागणी केली आहे.