पैसे वाचविणारे वॅलेट

न्यूयॉर्क- पर्स अथवा वॅलेटचा वापर सर्वसाधारणपणे पैसे ठेवण्यासाठी केला जातो. पैसे हे खर्च करण्यासाठी असतात असाही आपला गोड समज असतो. मात्र अनेकवेळा अनावश्यक अथवा वायफळ खर्च आपल्याकडून केला जातो आणि मग वॅलेटमध्ये ठेवायला पैसेच राहात नाहीत. याचा अनुभवही अनेकदा आपण घेतो. यावर जपानी कंपनीने एक नामी उपाय शोधला आहे.त्यांनी पैसे खर्च करण्यापासून रोखणारे वॅलेट तयार केले आहे. वायफळ खर्च करणार्यां ना हे वॅलेट वरदान ठरेल असा कंपनीचा दावा आहे.

या वॅलेटमध्ये कंपनीने स्मार्टफोनच्या सहाय्याने चालू शकणारे एक अॅप बसविले आहे. जॅम अप्लीकेशन असे त्याचे नांव आहे. हे खास गॅजेट पाकिटात असलेली रक्कम व खर्च याचा हिशोबही ठेवणार आहेच पण पैसे कमी शिल्लक असतानाही तुम्ही खरेदी करायचा प्रयत्न कराल तर ते तुमच्या हातातून निसटेल. टेबलावर ठेवले असले तर गोलगोल फिरेल आणि तरीही तुम्ही ऐकत नसाल तर तुमच्या आईला अथवा बायकोला फोन करून अथवा मेल करून तशी तक्रारही पाठवेल. इतकेच नव्हे तर हातातून निसटताना तुम्ही ते पकडलेत तर रडका आवाज काढेल आणि त्याच आवाजात मदतही मागेल. आहे ना कमाल?
 
हे अॅप्लिकेशन दोन प्रकारे काम करते असे कंपनीचे म्हणणे आहे. पैकी पहिला सेव्ह मोडमध्ये ते पैसे कमी असताना तुम्हाला खर्च करू देत नाही तर दुसर्यात कंझप्शन मोडमध्ये पाकिटात खूप पैसे असतील तर खरेदीला हिरवा कंदिल दाखवेल आणि तुम्हाला पैसे खर्च करण्यासाठी पूर्ण परवानगीही देईल. खर्च केलेले पैसे आणि शिल्लक याचा जमाखर्चही ते मांडेल.

अर्थात हे वॅलेट आपलेसे करण्यासाठी तुम्हाला अजून कांही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण त्याचे व्यावसायिक उत्पादन असून सुरू करण्यात आलेले नाही.

Leave a Comment