कटकमध्ये आज पावसाशी सामना

कटक: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामधल्या वन डे मालिकेतील पाचवा सामना शनिवारी कटकमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र पावसामुळे या सामन्यात खेळ होईल की नाही, याविषयी साशंकता आहे.यापूर्वीच रांचीतील चौथ्या वनडेमध्ये पावसाने हजेरी लावल्याने सामना ड्रा झाला होता. आता कटकच्या मैदानातल्या पाचव्या वन डेवरही पावसाचे सावट असल्या्नेहा तरी सामना होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

कटकमध्ये बाराबती स्टेडियमवर शनिवारी दुपारी दीड वाजता हा सामना सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र ओरिसामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाने लावलेली हजेरी पाहता पाचव्या वन डेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पावसामुळे दोन्ही टीम्सना सामन्याच्या आदल्या दिवशी सरावही करता आलेला नाही. पावसाने उघडीप घेतली तरी ग्राऊंड खेळण्यायोग्य होण्यासाठी वेळ लागू शकतो. आणि ओलसर ग्राऊंडवर ढगाळ वातावरणात खेळणे दोन्ही टीम्ससाठी आव्हानात्मक ठरेल.

सात सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पुणे आणि मोहालीतले सामने जिंकत २-१ अशी आघाडी घेतली आहे. मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाला आता राहिलेले तीनही सामने जिंकावे लागतील. दोन्ही संघांमधली टक्कर पाहण्यासाठी कटकवासी उत्सुक आहेत, आणि या वन डेची सर्व ४५ हजार तिकिटे विकली गेली आहेत.

Leave a Comment