कन्याकुमारी – भारताचा शेवटचा बिंदू

भारतमातेच्या शिरावरील मुकुट म्हणजे हिमालय आणि भारतमातेचे चरणकमल म्हणजे कन्याकुमारी असे म्हटले जाते. एक खाडी, एक सागर आणि एक महासागर यांचा येथे संगम होतो. भारतमातेच्या चरणकमलांवर यामुळे सतत अभिषेक  होत असतो. पर्यटनाबाबत बोलताना केरळ कन्याकुमारी असा उल्लेख केला जात असला तरी कन्याकुमारी येते तमीळनाडू राज्यात. पण केरळपासून खूपच जवळ असल्याने केरळ कन्याकुमारी असाच उल्लेख केला जातो. भारतीयांसाठी कन्याकुमारी हे केवळ तीर्थस्थान नाही. येथे भारताची हद्द संपते म्हणूनही त्याचे आकर्षण मोठे आहे. अर्थात देशी पर्यटकांप्रमाणेच परदेशी पर्यटकांतही कन्याकुमारी आवडते पर्यटनस्थळ आहे.
kanyakumari
पूर्वेला बंगालची खाडी, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंद महासागर अशा स्थानी वसलेले कन्याकुमारी आणखी एक अनोखा अनुभव पर्यटकांना देते. तो म्हणजे येथे समुद्रतटावर सूर्योदय जसा दिसतो तसाच सूर्यास्तही. किनारपट्टीवर अशी संधी अन्यत्र कुठेही दिसत नाही. मात्र सूर्यास्त असो वा सूर्योदय दोन्ही पाहायला मिळणे म्हणजे चंद्रबळ चांगले असणे आवश्यक. कारण येथे बरेचवेळा आकाश अभ्राच्छादित असते. स्वच्छ आकाशाचा अनुभव कवचितच येतो. तसेच सागरकिनारा हा प्रकार नाहीच. कारण किनारा खडकाळ असून मोठमोठे खडक येथे आहेत. तिन्ही समुद्रपाण्याचे वेगवेगळे रंग सहज दिसून येतात. त्यामुळे समुद्रावरची रेतीही तीन रंगात आढळते. या संगमाजवळच आहे कन्याकुमारीचे सुंदर मंदिर.
kanyakumari1
मंदिर पूर्वाभिमुख असले तरी भाविकांना प्रवेश उत्तरदारातूनच करावा लागतो. गोपुरातून आत प्रवेश केला की दिसतात दोन्ही बाजूंनी असलेल्या दगडी कोरीव खांबांच्या लांबच लांब रांगा. हे मंदिर पांड्य राजाच्या काळात बांधले गेले असे सांगतात. ही त्यांची कुलदेवता. पुराणातील कथा मात्र सांगते की वाणासुर हा राक्षस उपासना करून बलाढ्य बनला होता आणि त्याने देवांकडून अनेक वर मिळविले होते. नंतर तो सर्वांनाच छळायला लागला तेव्हा सर्व विष्णूला शरण गेले मात्र विष्णूने वाणासुराचा अंत देवीच करू शकेल असे सांगितले. वाणासुराला अमरत्त्वासाठी अनेक वर प्राप्त असले तरी कुमारीच्या हातून मरण येणे शक्य होते कारण त्याने हा वर मागितलेला नव्हता. तेव्हा पार्वतीदेवीच कुमारीच्या रूपात इथे अवतरली आणि तिने वाणासुराचा अंत केला. आपल्या नियोजित वराची वाट पाहात ती येथेच उभी राहिली मात्र तिचा वर आलाच नाही अशी कांहीशी काळजाला हात घालणारी ही कथा. असेही सांगतात की वाणासुरानेच तिला मागणी घातली आणि त्यामुळे चिडून  युद्धासाठी आव्हान देत हातातील चक्राने तिने वाणासुराला ठार केले.
kanyakumari3
या देवीचे दर्शन हा नितांत आनंददायी अनुभव आहे. विविध अलंकाराने युक्त आणि अतिशय सौष्ठवपूर्ण अशी ही मूर्ती. तिच्या नाकातील हिरा इतका तेजस्वी आहे की समईच्या प्रकाशातही त्याची आभा मोहून टाकते. पूर्वेतील दारातून येणार्‍या सूर्यकिरणांमुळे हा हिरा इतका चकाकतो की मूर्ती दिसणेही अशक्य होते म्हणून हे दार बंद ठेवण्यात येते असेही सांगितले जाते.
kanyakumari2
देवीच्या मंदिराबाहेर येऊन समुद्राकडे नजर टाकली की दिसतात दोन भव्य खडक. आत खोलवर समुद्रातील या दोन खडकांवर आहेत दोन भव्य स्मारके. बोटीने तेथे जावे लागते. पहिले आहे रॉक मेमोरियल. स्वामी विवेकानंद पोहत या खडकावर गेले तेव्हा तिथे साधना करताना त्यांना ज्ञानाची अनुभूती आली असे म्हणतात. त्यानंतरच त्यांनी शिकागो येथील धर्म परिषदेत बोलताना भारताचे नांव जगात अजरामर केले. १९७० मध्ये हे स्मारक उभारण्यात आले. अजंठा वेरूळच्या भव्य गुंफांचा अनुभव यावा यापद्धतीचे हे स्मारक लाल दगडात बांधण्यात आले आहे. आतील भवनात असलेली विवेकानंदांची भव्य मूर्ती अगदी सजीव वाटते.या खडकापासून जवळच असलेल्या दुसर्‍या खडकावर तमीळ संतकवी तिरूवल्लूवर यांची १३३ फूट उंच मूर्ती आहे. पाच हजार शिल्पकारांनी ती घडविली असे सांगतात. मंदिराजवळच पायी जाण्याच्या अंतरावर आहे महात्मा गांधींचे स्मारक. गांधींच्या अस्थी विसर्जनासाठी येथे आणल्या होत्या तेव्हा कांही काळ हा कलश या जागी ठेवण्यात आला होता. आता तेथेच हे स्मारक असून त्याला गांधी मंडप असे म्हणतात. येथे कांही फोटो व अन्य वस्तूंचा संग्रह आहे. या भागात साधारणपणे तमीळ आणि मल्याळी भाषा अधिक बोलल्या जात असल्या तरी पर्यटकांची वर्दळ मोठी असल्याने हिदी कांहीजणांना समजते.

kanyakumari4

(फोटो सौजन्य – holidayiq.com)
कन्याकुमारी गांव तसे बर्‍यापैकी मोठे असून राहण्यासाठी अनेक चांगली हॉटेल्स येथे उपलब्ध आहेत. जेवण्याखाण्याचे अजिबात हाल नाहीत कारण विविध दाक्षिणात्य चवदार पदार्थ रसना तृप्त करण्यासाठी सज्ज असतात. खरेदीसाठी महिलावर्गाला भावतील अशा सुंदर सुती साड्या, रेशमी साड्या, शंख शिपल्यांपासून बनविलेल्या अनेक सुंदर वस्तू आणि मौल्यवान तसेच सेमी प्रेशस स्टोनचे अनेक दागिने सज्ज आहेतच. रस्त्याने जाताना दोन्ही बाजूला असलेली नारळीची बने सारा प्रवास आनंदाचा करून टाकतात. रेल्वेची सोय उत्तम आहे तसेच विमानाने त्रिवेंद्रम येथे येऊन तेथून कन्याकुमारीला जाता येते. जाण्यासाठीचा चांगला काळ म्हणजे जानेवारी ते एप्रिलपर्यंतचा. तेव्हा यंदाच्या सुट्टीत कन्याकुमारीची ट्रीप ठरवायची ना?

Leave a Comment