
मुंबई- अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबियांची काही दिवसांपूर्वी हत्याू झाली होती. या हत्याकांडाचा पुनर्तपास करण्यास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) असमर्थता दाखवली आहे. आपल्याकडे खूप ताण असल्याचे कारण सीबीआयने दिले आहे.
लैला आणि तिच्या कुटुंबातील पाच सदस्यांच्या हत्येचा मुंबई पोलिसांकडून योग्य तपास केला जात नसल्याचा आरोप करीत सीबीआयकडून प्रकरणाचा पुनर्तपास करण्याची मागणी लैलाचे वडील नादिर पटेल यांनी उच्च न्यायालयात केली आहे.
न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळेस सीबीआयने याचिकेवर आपले उत्तर दाखल करताना कामाच्या अतिताणामुळे या प्रकरणाचा तपास करण्यास असमर्थता दाखवली. सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाकडून वर्ग करण्यात आलेल्या अनेक संवेदनशील गुन्ह्यांचा तपास यंत्रणेकडून करण्यात येत आहे. परिणामी यंत्रणेवर कामाचा खूप ताण असून या प्रकरणाचा तपास करू शकत नसल्याचे सीबीआयने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला कळविले.