सांगलीत पाच सावकारांना मोका, नव्या पोलीस अधीक्षकांची कारवाई

सांगली – खाजगी सावकारीच्या बळावर शेतकर्‍यांच्या जमिनी बळकावणार्‍या सांगलीतल्या पाच सावकारांवर मोक्का लावण्यात आला आहे. गेल्या 15 दिवसांपासून तब्बल 95 सावकारांवर पोलीसांची कारवाई सुरू आहे.

राज्याचे गृहमंत्री असलेल्या आर आर पाटील यांच्या सांगली जिल्ह्यात सावकारांची मुजोरी गेल्या काही वर्षात खूप वढली आहे. सावकाराकडून गरिबांच्या जमिनी लुबाडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. खाजगी सावकारीच्या पाशात अडकलेल्या शेतकर्‍यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रारीही दिल्या होत्या.. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पोलिसांनी सावकारांची मुजोरी मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.

दक्षिण महाराष्ट्रातील काही सहकारी बँका आणि पतसंस्था बंद पडल्यापासून गरजूंना अर्थ सहाय्य मिळवण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. याचाच फायदा जिल्ह्यातल्या खासगी सावकारांनी उठवला. दर महिना दर शेकडा पाच टक्क्यांपासून ते वीस टक्क्यांपर्यंत व्याज आकारणी केली. कर्जदाराला आपली शेती, घर अन्य मालमत्ता विकून या सावकाराच्या पाशातून मुक्तता करून घ्यावी लागते.

दर महिना दर शेकडा पाच ते वीस टक्के दर म्हणजे दरसाल दर शेकडा हाच दर 60 ते 240 टक्के दर होतो. म्हणजे एका वर्षात कर्जदाराला घेतलेल्या कर्जाच्या अडीचपट परतफेड करावी लागते. बर्‍या बोलाने परतफेड केली नाही तर धमक्या, गुंडगिरी आणि मारहाण असे उपायही कर्जवसुलीसाठी बिनदिक्कत अवलंबले जातात.

या खाजगी सावकारीमुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. सावकाराच्या दहशतीमुळे काहींना गाव सोडून परागांदा व्हावं लागलं आहे. या सावकारांकडून कर्ज घेण्यासाठी गरीब आणि मध्यम वर्गीय मोठ्या प्रमाणावर जातात. आजवर गुंडगिरी आणि दहशतीखाली असलेले हे कर्जदार पोलिसात तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. सावकारांचा ससेमिरा सुटावा म्हणून काहींनी तर मृत्यूला ही जवळ केलं पण काही सावकारांनी तर कर्जदारांच्या विधवांवरही अत्याचार केले.

मनसेचा नेता आणि पुण्यातील एक प्रसिद्ध उद्योजकाने तर आपल्याच कार्यकर्त्याला ट्रक खरेदीसाठी व्याजाने कर्ज दिले होते आणि त्याला व्याजासहित पैसे परत देण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्याप्रकरणी त्याला सांगली पोलिसांनी अटक ही केली होती. खुनाची धमकी देऊन अशिक्षित महिलेचा लाखो रुपयांचा फ्लॅट आणि घर बळकावल्याप्रकरणी कुख्यात सावकार यल्लाप्पा दोडमनी, जॉर्ज पिंटो यासह चौघांवर काल गुन्हा दाखल झाला आहे. यलाप्पा पोलिसांच्या छापा पडण्यापूर्वीच फरार झाला. पण त्याच्या चार साथीदारांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

Leave a Comment