राम गोपाल वर्माला जीवे मारण्याच्या धमक्या

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सिनेनिर्माता राम गोपाल वर्माला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे राम गोपाल वर्मा यांना पोलिस संरक्षण पुरवण्यात आले आहे. त्यांच्या घरी आणि ऑफिस अशा दोन्ही ठिकाणी पोलीस संरक्षण पुरवण्यात आले आहे. वर्माला जीवे मारण्याच्या धमक्या कोणाकडून आल्या याविषयी पोलिसांनी मौन बाळगले आहे. या प्रकरणचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

राम गोपाल वर्मा यांच्या दूरध्वनी संभाषणातून त्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार हे सरंक्षण पुरवण्यात आले आहे. रामूला नेमके कोणाकडून फोन आला, आणि त्याने कशासाठी धमकी दिली याबाबत रामूने ट्वीटरवर कसलीही माहिती दिलेली नाही. राम गोपाल वर्माच्या आगामी सत्या टू या सिनेमावरून त्याला धमकी देण्यात आल्याची चर्चा असली तरी त्याबाबतही रामूने काही भाष्य केलेले नाही.

यासंदर्भात पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनीही काही माहिती देण्यास नकार दिला. एखाद्याला आलेल्या धमकीबाबत काही माहिती देणं व्यावसायिकतेला धरून होणार नाही, असे त्यांनी सांगितले. राम गोपाल वर्माचा सत्या टू हा सिनेमा आधीच्या नियोजनानुसार शुक्रवारी प्रदर्शित होणार होता. आता त्याचं प्रदर्शन आठ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले असल्याचे समजते.

Leave a Comment