महाराष्ट्रात ३० टक्के वधू अल्पवयीन

मुलीचा विवाह वयाच्या १८ व्या वर्षानंतरच करावा असा कायदा असतानाही महाराष्ट्रात होणार्‍या विवाहांमध्ये ३० टक्के मुलींचे विवाह कमी वयात होतात, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका पाहणीत आढळून आले आहे. राज्यातल्या बालकांतील कुपोषणाची उदंड चर्चा होत असते. त्या कुपोषणाला आहाराची कमतरता कारणीभूत असल्याचे मानले जाते. पण मुलींच्या कमी वयात विवाह होण्यामुळेही लहान मुले कुपोषित होत असतात. कारण या मुलांच्या माता कमी वयात माता झालेल्या असतात.

१८ वर्षांच्या आत विवाह झालेल्या या मुली विसाव्या वर्षाच्या आत मुलांना जन्म देतात. तोपर्यंत त्यांच्या शरीराची पुरेशी वाढ झालेली नसते. सशक्त आणि निरोगी बाळ जन्माला येणे हे त्याच्या आईला गरोदरपात मिळणार्‍या आहारावर अवलंबून असते. या अवस्थेतल्या वैद्यकीय सोयी शहरात मोठ्या प्रमाणात आणि सहजगत्या उपलब्ध असतात. पण गरोदरपणातला पूरक आहार मिळण्याबाबत शहरांपेक्षा खेडी आघाडीवर असल्याचे या पाहणीत दिसून आले आहे. हा पूरक आहार अंगणवाडीच्या माध्यमातून दिला जात असतो. अंगणवाड्या खेड्यांमध्ये जास्त असतात. म्हणून गरोदरपणात असा आहार घेण्याचे प्रमाण ग्रामीण भागात ८४ टक्के तर शहरात केवळ २१ टक्के आहे.

पण एवढ्यावरही खेड्यातच लहान मुले अधिक प्रमाणात कुपोषित असतात. कारण पहिली प्रसूती होताना मातेचे वजन आणि उंची चांगली असणे गरजेचे असते. पण शहरी भागात २२ टक्के तर ग्रामीण भागात ४० टक्के प्रथम माता वजन-उंचीची ही अट पूर्ण करू शकत नाहीत. अशी माताच कुपोषित असेल तर तिच्यापोटी जन्माला येणारे मूल कसे निरोगी असणार? शासनाच्या यंत्रणेमार्फत अल्पवयातले विवाह थांबवण्याचे अनेक प्रयत्न केले जातात. पण लोक त्या प्रयत्नांंना दाद देत नाहीत. वयाची खोटी प्रमाणपत्रे सादर करून मुलगी १८ वर्षांची असल्याचे दाखवले जाते. त्या अल्प वयात माता होतात. पण अनेक प्रकारच्या विकारांनी ग्रस्त होऊन जन्मभर ते विकार सोबत घेऊन जगत असतात.

Leave a Comment