अजय देवगण आणि काजोलच्या घरी सोन्याच्या बांगड्याची चोरी

मुंबई – फिल्मस्टार अजय देवगण आणि काजोल यांच्या जुहूमधील घरावर चोरट्यांनी हात साफ केला आहे. यामुळे अभिनेत्री काजोलला आपली करवा चौथ दागिन्याशिवायच साजरी करावी लागली. अजय देवगणच्या घरात चोरी होण्याची ही दुसरी घटना आहे.

मंगळवारी 22 ऑक्टोबरला आपल्या घरात चोरी झाल्याचे काजोलच्या लक्षात आले. ती करवा चौथ या सुहासिनीच्या व्रतासाठी तयार होत असताना घरात ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याचं तिच्या लक्षात आले. या चोरीसाठी घरातीलच कोणीतरी जबाबदार असल्याचा संशय पोलिसांना आहे.

अजय देवगण यांच्या घरातील पाच लाख रूपये किंमतीच्या, सोन्याचे तब्बल 17 कंगण चोरीला गेल्याची तक्रार अजय आणि काजोल या दाम्पत्याने जुहू पोलिस स्टेशनमध्ये केली आहे. काजोलचे सोन्याचे कंगण चोरीला गेल्याबद्धल अजय किंवा काजोल यांच्याकडून काहीही माहिती आली नसली तरी पोलिस स्टेशनमध्ये त्याबाबतची तक्रार आली आहे, शिवाय काजोलची आई तनुजानेही सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्या असल्याचे सांगितले, मात्र त्यांनी अधिक माहिती देण्यास असमर्थता दर्शवली.

अजय देवगण याच्या जुहूतील बंगल्यावर यापूर्वी 2008 मध्येही चोरी झाली होती. त्यावेळीही घरातील नोकरांपैकीच एकानेच चोरी केल्याचं पोलीस तपासात उघड झाले होते. या चोराला नंतर पोलिसांनी छत्तीसगढमधून अटक केली होती. करवा चौथच्या आधीच घरात चोरी झाल्याचे आणि या चोरीमध्ये आजय देवगणनेच भेट दिलेल्या बांगड्या चोरीला गेल्याने काजोलच्या करवा चौथच्या आनंदात विरजण पडले. जुहू पोलिसांनी या चोरीप्रकरणी घरातील सर्व नोकरांची चौकशी सुरू केलीय. अजून कोणालाही ताब्यात घेण्यात आले नसले तरी लवकरच चोराला जेरबंद करू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment