चौकशीसाठी सामोरे जाण्यास तयार : पंतप्रधान

नवी दिल्ली – कोळसा घोटाळ्याप्रकरणी सीबीआय चौकशीला सामोरं जाण्याची तयारी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी दाखवली आहे. चीनच्या तीन दिवसीय दौर्‍यावरून परतत असताना पंतप्रधान विमानात पत्रकारांशी बोलत होते. कायद्यापेक्षा कुणीही वर नाही, तो नियम मलाही लागू होतो, असं पंतप्रधान म्हणालेत. विशेष म्हणजे कोळसा घोटाळ्याप्रकरणी पंतप्रधानांना आरोपी नंबर वन करावं, अशी मागणी माजी कोळसा सचिवांनी गेल्याच आठवड्यात केली होती. तसेच राज्यसभेतले विरोधी पक्ष नेते अरूण जेटली यांनीही, मनमोहनसिंगांची सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली होती.

त्यापार्श्वभूमीवर मनमोहनसिंग यांचं वक्तव्य महत्वाचं मानलं जातं आहे. विशेष म्हणजे चीननं मनमोहनसिंग यांचा दौरा ऐतिहासिक आणि यशस्वी झाल्याचं म्हटलंय. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाचाही चीनमध्ये गौरव करण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान मनमोहनसिंग आणि चीनचे पंतप्रधान ली किकियांग यांच्यात महत्वाच्या 9 करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्यात. त्यात सीमावाद, दोन्ही देशातून वाहाणार्‍या ब्रम्हपुत्रा नदीवरचा डॅम, तसच व्यापारात समतोल निर्माण करण्याचा निश्चय करण्यात आलाय. पण अरूणाचल प्रदेशच्या संदर्भात असलेल्या व्हीसाच्या मुद्यावर कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.