मुंबई – भारताचा सर्वात मोठा सोने बाजार अशी ओळख असलेल्या मुंबईतील जव्हेरी बाजारात सोन्याची अभूतपूर्व टंचाई जाणवत असून सणाच्या तोंडावर जाणवणार्या या टंचाईने सोन्याचे ठोक व्यापारी हैराण झाले आहेत. परिणामी सोन्याच्या मागणीसाठी सराफांकडून येत असलेले फोन न घेण्याकडे या व्यापार्यां चा कल झाला आहे.
सरकारने चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी सोने आयातीवर गेले कांही महिने कडक निर्बंध घातले आहेत. देशाचे सर्वाधिक चलन इंधनानंतर सोन्यासाठी खर्च होत असते. परिणामी सरकारने आयात शुकलात वाढ केली आहे पण आयातीवर निर्बंधही घातले आहेत. परिणामी गेल्या दोन अडीच महिन्यात अत्यंत कमी सोने भारतात उपलब्ध होत आहे. सणाच्या दिवसात सोन्याला वर्षभरातील सर्वाधिक मागणी असते. आता दिवाळी तोंडावर आहे मात्र ठोक व्यापार्याकडे किरकोळ सराफांना देण्यासाठी सोनेच उपलब्ध नाही.
बाजारात मोठे सराफ तसेच किरकोळ सराफ व्यावसायिकांना सोन्यासाठी जागोजाग भटकंती करण्याची वेळ आली असल्याचेही सांगितले जात आहे. वितरकांकडून सोने मिळत नाही तर बँकांकडून मिळविण्याचा प्रयत्नही केला जात आहे. सध्या दुकानात तयार असलेला माल हातोहात खपत असल्याने अनेकांच्या भल्यामोठ्या शोरूम्स अर्ध्याहून अधिक रिकाम्या पडल्या आहेत. नवीन नोंदणी करून घेणे अशक्य बनले आहे असे येथील सराफ व्यावसायिक सांगतात.
देशातील सर्वात मोठे बुलीयन डिलर असलेल्या रिद्धिसिद्धी बुलियन लिमिटेडचे मालक पृथ्वीराज कोठारी म्हणाले की सोने टंचाईला सरकारी धोरण कारणीभूत आहे. त्यांच्या पेढीकडे दररोज किमान ३०० किलो सोन्याची मागणी असायची पण आजकाल २० ते ३० किलो सोनेही ते सराफांना देऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. गेले दोन महिने सोन्याची आयात अत्यंत नगण्य असल्याने सणाच्या तोंडावर सोन्याचा असलेला स्टॉकही संपुष्टात आला असल्याचे कोठारी यांचे म्हणणे आहे. परिणामी दागिने निर्यातीतही घट झाली आहे.