सार्वजनिक वितरणासाठी खुल्या बाजारातून साखर खरेदी करण्याचा निर्णय

मुंबई – सार्वजनिक वितरण व्यवस्थेखालील सद्याच्या लाभार्थ्यांसाठी खुल्या बाजारातून ई-निविदेव्दारे साखर खरेदी करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ही साखर प्रति किलो 13 रुपये 50 पैसे दराने प्रति माणशी 500 ग्रॅम व सणासुदीच्या काळात प्रति माणशी 660 ग्रॅम देण्यात येईल.

याचा फायदा दारिद्र्य रेषेखालील व अंत्योदय योजनेच्या 2 कोटी 78 लाख लाभार्थ्यांना होणार आहे. केंद्र सरकारने साखर उद्योग नियंत्रण मुक्त केल्यानंतर लेव्ही साखर बंद झाली होती. त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून लाभार्थी शिधापत्रिका धारकांना वितरित करण्यासाठी साखरेची खरेदी खुल्या बाजारातून करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाचा फायदा सध्याचे दारिद्र्य रेषेखालील व अंत्योदय योजनेचे 2 कोटी 78 लाख लाभार्थी, तसेच केंद्रीय राखीव पोलीस दल, राष्ट्रीय संरक्षण राखीव दल, सीमा सुरक्षा दल यांना मिळेल. खुल्या बाजारातून सहा-सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ई-निविदा मागवून जिल्हानिहाय साखर खरेदी करण्यात येईल. ही निविदा संबंधित जिल्हाधिकारी मागवितील.

मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी मुंबई, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील शहरी भाग यासाठी तीन स्वतंत्र निविदा शिधावाटप नियंत्रकांमार्फत मागविण्यात येतील. अशी खरेदी केलेली साखर पुरवठादारामार्फत जिल्ह्याच्या संबंधित गोदामापर्यंत निविदाधारकाच्या खर्चाने पोच करण्यात येईल.

Leave a Comment