मिझोरम मध्ये ४ डिसेंबर ऐवजी २५ नोव्हेंबरला मतदान

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने मिझोरम येथे होत असलेल्या विधानसभा निवडणूक मतदानाच्या तारखेत फेरबदल केला असून हे मतदान ४ डिसेंबरऐवजी २५ नोव्हेंबरला होणार आहे. बहुतेक सर्व राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था व धार्मिक संस्थांनी निवडणूक आयोगाकडे मतदानाच्या तारखा बदलल्या जाव्यात अशी विनंती केली होती कारण प्रिसबायटेरियन चर्च डिसिजन मेकींग परिषद – सायनोड ३ ते ८ डिसेंबर या काळात येथे होत आहे. त्यामुळे दोन्ही तारखा एकत्र येऊ नयेत अशी मागणी केली जात होती.

नव्या बदलानुसार ४० सीट असलेल्या मिझोरममध्ये १ नोव्हेंबरला निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार आहे. उमेदवारी अर्जाची अंतिम मुदत ८ नोव्हेंबर असून अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ११ नोव्हेंबर अशी आहे. अर्जाची छाननी ९ नोव्हेंबरला होणार असून मतमोजणी ८ डिसेबरला केली जाणार आहे असे राज्याचे निवडणूक प्रमुख अधिकारी एच. ललेंगमवाई यानी जाहीर केले आहे.

Leave a Comment